मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जून २४ सोमवार
मध्य प्रदेशात गाय तस्करी विरोधातील मोहिमेचा भाग म्हणून ११ घरांवर बुलडोझर फिरवण्यात आला असून या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ,गायी यांच्यासह जनावरांचे अवशेष आणि हाडे सापडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.मध्य प्रदेशमधील आदिवासीबहुल जिल्हा असणाऱ्या मांडलाच्या नैनपूर परिसरात ही कारवाई करण्यात आली.दरम्यान घरांवर कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटसा पाठवण्यात आल्या होत्या त्यामुळे त्यांच्याकडे नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ होता असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आल्याचे इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.ही सगळी घरे सरकारी भूखंडावर होती.पोलिसांनी या प्रकरणी ११ लोकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.शनिवारी संध्याकाळी नैनपूरमधील भैन्सवाही गावात ही घटना घडली.या घरांवर छापा टाकणाऱ्या पोलीस पथकाने ११ आरोपींपैकी एकाला अटकही केली आहे.वाहिद कुरेशी असे या आरोपीचे नाव असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानही करण्यात आली आहे.आरोपींपैकी ५ ते ६ आरोपींचा याआधीही गाय तस्करी प्रकरणात सहभाग आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मांडलाचे पोलीस अधीक्षक रजत सकलेचा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार,हा १५००० चौरस फुटांचा भूखंड चराई क्षेत्र म्हणून स्थानिक प्रशासनाने जाहीर केला होता व त्यावर ही घरे बांधण्यात आली होती.काही दिवसांपूर्वी स्थानिक प्रशासनाने या अतिक्रमणासंदर्भात या घरांना नोटिसाही पाठवल्या होत्या त्यामुळे आदेश मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या घरांवर कारवाई केली.दरम्यान गाय तस्करीबाबतही सकलेचा यांनी माहिती दिली असून या गावात याआधीही गाय तस्करीची ५ ते ६ प्रकरणे समोर आली होती त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवण्यात आली होती.यावेळी आम्हाला माहिती मिळताच तीन पथकांनिशी आम्ही कारवाई केली व त्यांनी टाकलेल्या छाप्यात या घरांमधील फ्रीजमधून बीफ ताब्यात घेण्यात आले आहे त्याशिवाय जवळपास १०० जनावरे,जनावरांची हाडे तिथे सापडली त्याशिवाय जवळपास १५० गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले.मध्य प्रदेशातील मांडला ते जबलपूर या भागात हे गाय तस्करीचे रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपीचा एक नातेवाईक मोठा व्यावसायिक असून तो जबलपूरला राहतो.जनावरांची हाडे सप्लिमेंट तयार करण्यासाठी वापरण्यात येणार होती तर त्यातले मांस इतर उत्पादनांसाठी वापरले जाणार होते अशी माहिती एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.