शिंदे साहेब आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावे मी आपल्यासोबत राहीन
युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष ऑफर
दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख
राज्यातील सत्तासंघर्ष सातत्याने नवनवी वळणे घेत असतानाच शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे राखीव चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला होता.त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटालाही नवे चिन्हाचा शोध घ्यावा लागणार आहे.या कठीण प्रसंगात अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी एकनाथ शिंदे यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष ऑफर दिली आहे.त्यांनी ही ऑफर शिंदे गटातील ४० आमदारांना सुद्धा दिली आहे.रवी राणा यांनी ट्विट करून म्हटले आहे की,आदरणीय शिंदे साहेब आपणास गरज पडल्यास माझ्या पक्षाचे चिन्ह असलेले पाना घेऊन आपल्यासोबत उभा राहीन. आपण युवा स्वाभिमान पार्टी आणि पाना हे चिन्ह घ्यावे अशी ऑफर राणांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहे.त्यामुळे आता शिंदे गट ही ऑफर स्वीकारणार का?हे पाहावे लागेल.
दरम्यान निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर शिंदे गट रिक्षा हे चिन्ह घेणार असल्याची एक पोस्ट व्हायरल झाली होती.मात्र शिंदे गटाकडून त्याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नव्हते.शिंदे गटाच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यात ५१ फुटांची तलवार उभारण्यात आली होती.त्यामुळे शिंदे गट तलवार या चिन्हावरही निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.