मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जून २४ गुरुवार
शिवसेना पक्षाचा काल ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत.यामध्ये वरळीच्या एनआयसी येथे शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी मोठ्या संख्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला.“लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे.उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली मग आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले ? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.आज शिवसेनेला ५८ वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे माझ्या मनामध्ये वेगळा आनंद आहे.बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली आणि मराठी माणसांसाठी न्याय हक्क मिळावा,नोकऱ्या मिळाव्या यासाठी लढा दिला त्यानंतर पुढे शिवसेनेची भूमिका वाढत गेली.शिवसेना पूर्ण देशभरामध्ये हिंदुत्वाचा गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली.आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे.आज ठाणे,कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना वाढली आहे.आपण या निवडणुकीत शिवसेनेचे बालेकिल्ले अबाधित ठेवले आहेत.ठाणे,कल्याण,छत्रपती संभाजीनगर आपण जिंकले आहे.दुसरीकडे कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळू शकली नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपण घासून नाही तर ठासून विजय मिळवला आहे.शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला त्यामुळे मनापासून सर्वासमोर मी नतमस्तक होतो असे एकनाथ शिंदे म्हणाले.
काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण उठाव केला व तो उठाव योग्य होता हे या निवडणुकीमध्ये जनतेने दाखले.आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे आपण निवडणुकीमध्ये पाहिले. जनतेच्या विश्वासाला आपण कधाही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी देतो.आज बाळासाहेब ठाकरे असते तर काय म्हणाले असते ? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो…. आज त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.ते पुढे म्हणाले,शिवतीर्थावर भाषण करतांना सर्व इंडिया आघाडीचे नेते होते पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो…असे म्हणू शकले नाहीत.आजही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात तमाम हिंदू बांधवांनो,भगिनींनो आणि मातांनो म्हणाले नाही मग तुमचे हिंदुत्व कसले आहे ? बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही.गर्व से कहो हम हिंदू है,ही गर्जना बाळासाहेबांनी देशात गाजवली.आता उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेले ? त्यामुळे धनुष्यबाण पेलण्याची ताकद आपल्यात आहे.आज आपण लोकसभेच्या ७ जागा जिंकलो.आता महायुतीमध्ये माझी जबाबदारी जास्त आहे व ती जबाबदारी सर्वांच्या साक्षीने पार पाडणार आहे.या सर्व वावटाळीमध्ये शिवसेनेचा मूळ आधार आहे तो मतदार दुसरीकडे गेला नाही व तो मतदार आपल्या कडेच आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.