बारामती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या महाराष्ट्रभर शेतकरी मेळावे घेत आहेत.काल दि.२० जून गुरुवार रोजी त्यांनी बारामतीमधील मोरगाव या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील एनडीएच्या अपयशावरून चिमटा काढला.शरद पवार म्हणाले,नुकतीच महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक झाली व या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे १८ दौरे केले.निवडणुकीत भाजपासह एनडीएच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी १८ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या परंतु त्या बिचाऱ्यांना माहिती नव्हते की त्यांनी ज्या १८ ठिकाणी सभा घेतल्या त्यातले दहा उमेदवार पडले.शरद पवार म्हणाले,मी उद्या दिल्लीला जाऊन मोदी यांना भेटून सांगेन तुम्ही महाराष्ट्रात जिथे जिथे गेलात तिथले ६० टक्के उमेदवार पडले.उद्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे तेव्हाही तुम्ही महाराष्ट्रात फिरा.मोदी या निवडणुकीत सतत मेरी गॅरंटी… मेरी गॅरंटी… असे ओरडत होते परंतु ते कोणी ऐकले नाही.मोदींच्या गॅरंटीवर कोणाचा विश्वास बसला नाही व त्यांचे नाणे महाराष्ट्रात काही चालले नाही तसेच त्यांची गॅरंटी भाजपाच्या कामाला आली नाही अशी टीका शरद पवार यांनी केली.
शरद पवार यावेळी शेतकऱ्यांना म्हणाले,इथे यायचे कारण म्हणजे नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली व या निवडणुकीत काही लोकांनी दमदाटी केली,नवीन पिढीतल्या लोकांना आवर घालण्याचे काम काही लोकांनी केले.निवडणुकीच्या प्रचाराला गावात गेल्यानंतर गावातले जे पुढारी होते त्यांचा काही पत्ता लागला नाही,कुठे गायब झाले माहित नाही.नव्या पिढीने ताबा घेतला.माळेगाव कारखाना असेल,सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक असतील,जिल्हा बँक असो,पंचायत समिती असो किंवा बारामतीचे दूध संघ असो या संस्थांमध्ये जे जे काम करतात त्यातील बहुसंख्य लोक या निवडणुकीत दिसतच नव्हते.काय भानगड होती मला माहित नाही नंतर चौकशी केली की लोक कोण होते ? कोणी सांगितले की कोणी कारखान्याचे डायरेक्टर.हळू चौकशी केली पोलिसांकडून आणि पोलिसांना विचारले हे कोण होते त्यांनी सांगितले काय विचारू नका त्यांचा धंदा होता हॉटेलचा तिथे काहीतरी दुसरेच बघायला मिळाले.लॉजिंगचा धंदा होता तिथे भलतेच लोक राहायला येतात याची बातमी आली.मला आश्चर्य वाटले मोरगावला महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक अष्टविनायकाचे दर्शन घ्यायला येतात त्याची सुरुवात मोरगाव पासून होते अशा पवित्र ठिकाणी लॉजमध्ये दुसराच धंदा चालतो अशी चर्चा बाहेर होणे हे या पवित्र ठिकाणाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे ? हीच मंडळी कालच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या कामात गुंतली होती.
यावेळची निवडणूक ही सामान्य लोकांनी,तरुण पिढ्यांनी,कष्टकऱ्यांनी हातात घेतली होती.मी स्वतः व शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बसलो आणि आम्ही ठरवले की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढायची.मोदींनी महाराष्ट्रामध्ये १८ दौरे केले,१८ ठिकाणी सभा केल्या.मला सांगायला वाईट वाटते की ज्या १८ ठिकाणी ते गेले त्यातील दहा ठिकाणी त्यांचा उमेदवार पडला म्हणून परवा मी सांगितले की मी दिल्लीला जाईन त्या वेळेला भेटून सांगेन मोदी साहेब तुम्ही जिथे जिथे गेलात तिथे ६० टक्के लोक पराभूत होतात व उद्या आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे तुम्ही जास्त तिथे या म्हणजे काय होते ते आम्हाला बघायला मिळेल.