“२५ जूनपासून चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने जारी केली महत्त्वाची माहिती” !!
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र,झारखंड,हरियाणा या ठिकाणीच्या निवडणूक पूर्वतयारीची सुरुवात
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जून २४ शुक्रवार
लोकसभा निवडणूक १ जून रोजी पार पडली व ही निवडणूक देशभरात सात टप्प्यांत घेण्यात आली होती तसेच ४ जून रोजी निकालही लागले. त्यानंतर ९ जूनला केंद्रात सरकारही स्थापन झाले असून आता महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे.यावर्षी हरियाणा, झारखंड,महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे व त्या दृष्टीने आता निवडणूक आयोगाने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.निवडणूक आयोगाने या निवडणुकांची तयारी म्हणून नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले असून तुम्ही जर आत्तापर्यंत मतदार म्हणून तुमची नोंदणी केली नसेल तर ती तातडीने करुन घ्या असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.दि.२५ जूनपासून म्हणजेच येत्या चार दिवसांपासून महाराष्ट्र,हरियाणा,झारखंड,जम्मू काश्मीर या ठिकाणी निवडणुकीच्या आधीची तयारी सुरु होणार असून पोलींग स्टेशन्स,मतदारांचे समूह यांची चाचपणी केली जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ व्या लोकसभेसाठीची निवडणूक पार पडल्यानंतर आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र,झारखंड,हरियाणा या ठिकाणी निवडणूक पूर्वतयारी सुरु केली आहे.हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर,महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २५ ला संपणार आहे.त्यादृष्टीने आता राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगाने राज्यांना केली आहे.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे.४५ प्लसचा दावा करणाऱ्या महायुतीला अवघ्या १७ जागांवर यश मिळाले आहे तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहेत.लोकसभेतल्या या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावला आहे.लोकसभेत ज्याप्रमाणे लोकांनी भाजपाला नाकारले तसेच चित्र विधानसभेतही दिसेल आणि आम्ही १८० ते १८५ जागा जिंकू असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे तर भाजपासह महायुतीनेही आम्ही चांगली कामगिरी करु असा दावा करत आम्हीच पुन्हा सत्तेत येऊ असे स्पष्ट केले आहे.भाजपाने जी फोडाफोडी केली ती लोकांना म्हणजेच खास करुन मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना भावली नाही हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले आहे.आता विधानसभा जिंकायची असेल तर भाजपाची रणनिती नेमकी काय ? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.