“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द देतात आणि नंतर तो शब्द सोयीस्करपणे विसरतात” !! राजू शेट्टींचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ जून २४ शनिवार
कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि स्थानिकांकडून कडाडून विरोध करण्यात येत असून काही नेत्यांनीही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे.काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते.नागपूर ते गोवा शक्तीपीठ हा महामार्ग रद्द करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द देतात आणि नंतर तो शब्द सोयीस्करपणे विसरतात’ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.मी एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे त्यामुळे कसलीही अपेक्षा न ठेवता मी शेतकऱ्यांसाठी लढतो.काही शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल तरीही मी माझे काम करत राहणार आहे.आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे देणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे मात्र केवळ निदर्शने केली म्हणून सरकारने टाळाटाळ केली.शेतकऱ्यांनी पोलिसांच्या लाठ्या खाल्या मात्र तरीही सरकारने दिलेला शब्द पाळला नाही मग शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचे काय झाले ? असा सवाल राजू शेट्टी यांनी उसाच्या एफआरपीच्या प्रश्नावरून केला आहे.
राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती सोहळा सरकार साजरा करणार आहे मात्र दुसरीकडे राजर्षी शाहू महाराजांच्याच जिल्ह्यात आज शेतकरी भूमिहीन होऊ लागला आहे.शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे.आता विधानसभेच्या तोंडावर अडचण येईल म्हणून महामार्गाचे भूसंपादन थांबवले असे सांगतात मात्र आम्हाला ही स्थगिती नको तर रद्द करण्याची आमची मागणी आहे. आम्ही आता राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंतीनिमित्त शेतकऱ्यांची कैफियत म्हणून पदयात्रा काढणार आहोत.२६ जूनला दीडशे शेतकरी घेऊन ही पदयात्रा काढली जाणार आहे असे राजू शेट्टी म्हणाले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्द देतात मात्र नंतर सोयीस्करपणे तो विसरतात.सरकारला शाहू महाराजांनी सुबुद्धी द्यावी यासाठी आम्ही ही पदयात्रा काढणार आहोत.शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे.एखादी बातमी व्हावी म्हणून आम्ही काही काम करत नसतो.विषय संपला असे म्हणून तो संपत नसतो.शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी चालला आहे ? कोणी मागणी केली आहे ? वाहतुकीची समस्या कुठे निर्माण झाली आहे ? सध्या जो महामार्ग आहे तो तोट्यात आहे.आता काहीजण सांगतात की भविष्याचा वेध घेऊन आम्ही हा महामार्ग करत आहोत मग २२ वर्षांनी करा आत्ता नको अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.