राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने आगामी विधानसभेला महायुतीपासून विभक्त होऊन निवडणूक लढावी यासाठी प्रयत्न चालू आहेत का ? असा प्रश्न विचारल्यावर अमोल मिटकरी म्हणाले,काही लोकांचे असेच प्रयत्न आहेत.अजित पवार यांनी महायुतीत राहू नये यासाठी त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.अजित पवारांनी स्वतःहून महायुतीपासून वेगळे व्हायला हवे यासाठी अजित पवार आणि आमच्या पक्षाला मानसिक त्रास दिला जात असून आमच्या पक्षाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु आम्ही ते होऊ देणार नाही. महायुतीकडून तुम्हाला वेगळे करण्याचा व एकटे पाडण्याचा प्रयत्न होत असतांना तुमच्याकडे प्लॅन बी आहे का ? किंवा स्वबळावर,इतर कुठल्या पक्षाबरोबर युती करून निवडणूक लढण्याचा विचार पक्षाने केला आहे का ? असा प्रश्न विचारल्यावर अमोल मिटकरी म्हणाले, स्वबळावर लढण्याबाबत विचार झाला आहे.काही आमदारांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे परंतु काही आमदारांचे असे म्हणणे आहे की त्यांच्या मतदारसंघात महायुतीतच निवडणूक लढवली पाहिजे कारण महायुतीत त्यांची ताकद आहे तर काही आमदार स्वतंत्र लढण्यासाठी तयार आहेत.अजित पवार गटातील आमदार म्हणाले,विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात आमची ५० ते ५५ जागांवर बोळवण होत असेल तर मग आम्ही वेगळा मार्ग निवडू शकतो व त्याचा निर्णय अर्थातच वरिष्ठ पातळीवर होईल.मला महायुतीमधील इतर पक्षांना सांगायचे आहे की त्यांनी आम्हाला कमजोर समजू नये.अजित पवार एकटेच जातील,एकटेच निवडणूक लढतील असे समजू नये असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले आहे.