जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळालेले नसून नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाले आहे.मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला व या दिग्गज नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचा समावेश आहे.यामध्ये बीडमधून पंकजा मुंडे आणि जालना मतदारसंघामधून रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे.पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे तर रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा मतदारसंघाचा दौरा सुरू करत कामाला सुरुवात केली आहे.आता पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे मतदारसंघात दौरे वाढले आहेत.या पार्श्वभूमीवर बोलतांना भाजपा नेते व माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘आपल्याला पक्षाने सरपंच होण्यास सांगितले तरी आपण सरपंच होऊ’ असे म्हटले आहे.रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे
मी ३५ वर्षे आमदार व खासदार राहिलो असून आता पक्षाने जर मला गावचा सरपंच होण्यास सांगितले तर मी गावचा सरपंच होईन कारण गावचा सरपंच झालो तर गावचा विकास तरी करता येईन असे रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे त्यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आले मात्र महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या.महायुतीला कमी जागा मिळाल्यामुळे महायुतील मोठा धक्का बसला.यानंतर आता महायुतीच्या जागा का कमी निवडून आल्या ? यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून विचारमंथन करण्यात येत आहे तसेच भाजपाच्यावतीने महाराष्ट्रभर चिंतन बैठकी सुरु आहेत.या अनुषंगाने रावसाहेब दानवे हे देखील मराठवाड्यातील काही मतदारसंघात दौरे करत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत तसेच या माध्यमातून विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा देखील घेतला जात आहे.लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे यांनी निवडणूक लढवली होती व त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते डॉ.कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली होती.या निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला त्यामुळे रावसाहेब दानवे यांना धक्का बसला आहे.