मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी लवकरच पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे तसेच विविध मतदारसंघात राजकीय नेत्यांचे दौरे वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.याबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार असल्याची चर्चा आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करायला उशीर झाल्यामुळे महायुतीला फटका बसल्याचे महायुतीमधील अनेक नेत्यांनी सांगितले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लवकरच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.अशातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘द ऑर्गनायझर’ मधील लेखात अजित पवार गटाला बरोबर घेतल्याने भाजपाला फटका बसला असल्याची टीका करण्यात आली होती तेव्हापासून महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासंदर्भात मोठे विधान केले असून “अजित पवार गटातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध आहे” असा मोठा दावा अंबादास दानवे यांनी केला असून ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
माझ्या माहितीनुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक झाली व त्यातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध केलेला आहे त्यामुळे विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भातील बातम्या या कल्पोकल्पित आहेत.अद्याप कोणत्याच पक्षाने जागा वाटप सुरु केलेले नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग आणि भाजपावर काही आरोप केले होते.मतदान सुरू असतांना उद्धव ठाकरे यांनी संथगतीने मतदान सुरु असल्याचे म्हटले होते व भाजपाने त्यावर आक्षेप घेतला होता त्यानंतर भाजपाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने यांसदर्भातील अहवाल मागवला आहे. यासंदर्भात बोलतांना अंबादास दानवे म्हणाले,निवडणूक आयोगाने त्यावेळी हे केले असते तर बरे झाले असते.तेव्हाच तत्काळ लक्ष द्यायला हवे होते मात्र काही हरकत नाही.देर आए,दुरुस्त आए.आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असे काही होऊ नये यासाठीची खबरदारी निवडणूक आयोगाने घ्यावी असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.