मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जून २४ बुधवार
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत.खासकरून अजित पवार गट आणि भाजपा यांच्यात विसंवाद होत असल्याचे सातत्याने समोर आले आहे.अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट नाव घेत अनेक भाजपा नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.यादरम्यान अमोल मिटकरी यांनी महायुतीतील घटकपक्षाला थेट इशारा दिला असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.येत्या काळात आणखी राजकीय वजन वाढणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अमोल मिटकरी यांनी मिश्किलपणे उत्तर दिले.ते म्हणाले,राजकीय वजन वाढले तर लोकांना त्रास होतो त्यामुळे मला राजकीय वजन वाढण्याची अपेक्षा नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतून अकोल्यातील किती जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा ठोकणार असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर मिटकरी म्हणाले,जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही दावा करतो.अकोला पश्चिममध्ये आमची ताकद आहे.विधानसभा महायुती एकत्र लढली तर मूर्तीजापूर मतदारसंघ आमच्याकडे परंपरांगत होताच तर बाळापूर मतदारसंघातही आम्ही दावा करू हे दोन मतदारसंघ हक्काचे मतदारसंघ आहेत.दरम्यान या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे भाजपा आणि शिवसेनेचा आमदार आहे त्यामुळे येथे उमेदवारी मिळेल का ? असाही प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर ते म्हणाले,आमदार म्हणून माझी ही मागणी आहे.मूर्तीजापूरमध्ये चांगला चेहरा आम्हाला मिळू शकेल तर मागच्यावेळी बाळापूर काँग्रेसकडे होता.आम्ही विनंतीपूर्वक ती जागा सोडवली परंतु तिथे आम्हाला यश आले नाही पण शेवटच्या क्षणी जर आम्ही महायुतीतून नाही लढलो तर आमची तयारी असली पाहिजे असेही ते पुढे म्हणाले.
ते पुढे म्हणाले,महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष म्हणत आहेत की १००-१०० जागा लढू म्हणजे ३०० जागा झाल्या आणि आपल्या २८८ जागा आहेत.लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येकाने तर १०० चे ताणून धरले तर वेगळेच लढावे लागेल आणि महायुतीत आम्हाला फक्त ५५ जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असू असे मला वाटत नाही.समाधानी राहिलेही नाही पाहिजे असेही म्हणत त्यांनी आगामी परिस्थितीवर भाष्य केले आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचे खापर अजित पवारांवर फोडल्यानंतर अमोल मिटकरींनी महायुतीतील अनेक नेत्यांवर टीका केली त्यामुळे महायुतीत वाद असल्याचे समोर आले.यावरून महायुतीतील तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अमोल मिटकरींना संयमाने आणि समन्वयाने राहण्याचा सल्ला दिला.यावरून ते म्हणाले, महायुतीतील दोन्हींकडून (शिंदे गट) संजय शिरसाट आणि (भाजपा) प्रवीण दरेकर यांच्यावरही लगाम लावला पाहिजे.महायुतीत विसंवाद नको,तिन्ही एकत्र आलो पाहिजे असे सर्वांचे म्हणणे आहे त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सर्व समन्वयक एकत्र बसून ठरवतील की कोणी कोणावर बोलू नये.विसंगती होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.