“आम्ही कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपाबरोबर हात मिळवणार नाही व आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही” !! ठाकरे-फडणवीस भेटीमुळे पुन्हा युतीची शक्यता संजय राऊत फेटाळली
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जून २४ शुक्रवार
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून (२७ जून) सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला तर आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात महायुती सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे आमदार,नेते राज्य सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत.पुणे पोर्श अपघात प्रकरण,‘महानंद’ची विक्री,राज्यातील बेरोजगारी,महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक जाहीर होणार असल्याने हे पावसाळी अधिवेशन महत्वाचे आहे अशातच विधान भवनात घडलेल्या एका घटनेची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे हे विधीमंडळ अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले होते यावेळी दोन्ही नेत्यांनी सभागृहाकडे जाताना एकाच लिप्टमधून प्रवास केला.या काही मिनिटांच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का ? याबाबत कालपासून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
या भेटीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हस्तांदोलन केले यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की दोन्ही नोत्यांमध्ये हस्तांदोलन झाले आता दोन पक्षांमध्ये हातमिळवणी होईल का ? आगामी विधानसभा निवडणुकीत काही नव्या गोष्टी पाहायला मिळतील का ? यावर संजय राऊत म्हणाले,आम्ही कधीच भाजपाबरोबर हातमिळवणी करणार नाही. संजय राऊत म्हणाले,अनेकदा दिल्लीत आम्ही संसदेत असतो तेव्हा सभागृहाकडे जाणाऱ्या लिफ्टमध्ये आमच्याबरोबर वेगवेगळे नेते असतात. बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आमच्याबरोबर लिफ्टमध्ये असतात.मुळात तिथली व्यवस्थाच तशी आहे. तुम्हाला एकत्रच ये-जा करावी लागते कारण सगळ्यांना एकाच सभागृहाकडे जायचे असते त्यामुळे लिफ्टमध्ये किंवा इतर ठिकाणी एकमेकांच्या समोर आल्यावर हस्तांदोलन करणे,नमस्कार करणे हा शिष्टाचार असतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्याची आज राजकीय चर्चा करण्याची आवश्यकता नाही व त्या भेटीचे वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की,”आम्ही कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपाबरोबर हात मिळवणार नाही व आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही.”