पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा)
आजच्या घडीला शेतकरी किंवा कष्टकरी माणसाला मुलांसाठी वही घेणेही कठीण असते.त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने जोडण्याबाबत तज्ज्ञांनी विचार करावा आणि त्या दृष्टीने सूचना कराव्यात या उपक्रमाकडे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा उपक्रम म्हणून शिक्षकांनी पहावे असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.केसरकर म्हणाले कि शिक्षकांनी पुस्तकातील विषयावर दिलेली टिपणे विद्यार्थ्यांनी या पानांवर लिहावे अशी अपेक्षा आहे त्यावरून शिक्षकांनी वर्गात घेतलेला अभ्यासही लक्षात येईल. गरीबातल्या गरीब मुलालाही वह्यांची पाने असलेली पुस्तके उपयुक्त ठरतील.प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येईल आणि पालक-शिक्षकांकडून येणाऱ्या सूचनांच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल.विद्यार्थी यातील किती पानांचा लिखाणासाठी उपयोग करतात याचाही अभ्यास करण्यात यावा.यासाठी तज्ज्ञ शिक्षकांची एक समिती नेमण्यात येणार असून समिती सदस्य या उपक्रमाबाबत शिक्षकांना माहिती देण्यासोबत अभ्यासही करणार आहे असे केसरकर यांनी सांगितले.
पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याबाबत बालभारतीमध्ये विषय तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत केसरकर बोलत होते. या वेळी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील,राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी,शिक्षण संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
‘महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद होणार नाही.मात्र, पालकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाकडे लक्ष देण्याची गरज आहे.पालकांकडून रोज मुलगा गृहपाठ करत आहे का? हे पाहिले पाहिजे.शिक्षकांबरोबरच पालकांनीदेखील मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.