सौ.ज्योती लक्ष्मण जाधव,(प्राथमिक शिक्षिका)
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जुलै २४ शनिवार
तालुक्यातील काळाडोह या आदिवासी वस्तीतील पावरा जमातीच्या या प्राथमिक शाळेत मी शिकविते व या माझ्या शाळेतील मुलांची बोलीभाषा ही पावरी असून त्याना मराठी तसेच हिंदी भाषा समजते पण पूर्ण बोलता येत नाही.मूलाच्या बोली भाषेमुळे त्यांच्यावर अनेक शैक्षणिक गोष्टी परिणाम करत असतात.ही मुले लाजरी,मनातील शंका न बोलणारी असतात..त्यात त्यांचा काय दोष ? त्यांच्या आई-वडिलांचे जीवन संघर्षात अडकलेले,भूमिहीन,शेतमजूर,रोज कुठे ना कुठे कामाला जाणे व आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रोज कष्ट करणे हे होय.यामुळे आपली मुले शाळेत जातात की नाही ? याकडेही लक्ष नसते.परंतु माझ्या शाळेतील मुले इयत्ता पहिलीमध्ये आल्यानंतर आम्ही त्या मुलांना शाळेची सवय होईपर्यंत स्वतः बोलावणे,इतर मोठ्या मुलांना घेऊन येण्यास सांगणे परिणामी मुलांना शाळेची गोडी लागली की ती रोज शाळेत येऊ लागतात अशाप्रकारे आम्हाला मुलांना शाळेत आणण्याची अडचण दूर होते.
त्याचप्रमाणे उरला प्रश्न भाषेचा तर त्यासाठी आम्ही मोठ्या इयत्तेतील मुलांच्या मदतीने पहिलीच्या मुलांना समजण्यासाठी तसेच आम्हा शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी मोठ्या मुलांमुळे मदत होते व आम्हाला पहिलीतील मुलांना समजण्यास व शिकवण्यास सोपे जाते आणि ती मुलेही आमच्यासोबत मोकळेपणाने राहतात व संवाद साधतात तर यामुळे आज माझ्या शाळेतील मुले मराठी वाचन,गणिती क्रिया,इंग्रजीमध्ये १ ते १०० तसेच इंग्रजी अक्षर वाचन तसेच काही मुले इंग्रजी शब्द वाचन सुद्धा करतात.बोलीभाषा ही शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी अडचण असली तरी आपण त्यावर उपाय शोधून नक्कीच मुलांना शिकवू शकतो हा आमचा अनुभव आहे.
धन्यवाद ॥
ज्योती लक्ष्मण जाधव (प्राथमिक शिक्षिका)
जि.प.प्रा.शाळा काळाडोह,ता.यावल जि.जळगाव