नारीशक्तीचा ‘सर्व्हर डाऊन’ मुळे लाडक्या बहिणींची उडाली झोप !! लाडक्या बहिणींसोबत सेतू सुविधा केंद्र चालक व अंगणवाडी सेविका त्रस्त !!
गत चार ते पाच दिवसांपासून 'नारीशक्ती' अॅप सुरूच होत नसल्याने नवीन नोंदणी रखडली !!
मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि .७ ऑगस्ट २४ बुधवार
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोय आहे मात्र ज्या एप्लिकेशनवर अर्ज सादर करायचे तेच अॅप ‘सर्व्हर डाऊन’मुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही परिणामी लाडक्या बहिणींची झोप उडाली आहे.मध्यरात्री अर्ज भरावे लागत असल्याने अंगणवाडी सेविकांना जागरण करावे लागत आहे तसेच ‘ओटीपी’ साठी त्यांना रात्रीचीच फोनाफोनी करावी लागत आहे.
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी शासनाने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ‘नारीशक्ती’ अॅप उपलब्ध करून दिले.गत चार ते पाच दिवसांपासून मात्र ‘नारीशक्ती’ हे अॅप सुरूच होत नसल्याचे दिसून येत आहे.अॅपवर ‘क्लिक’ करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या तयारीत असलेल्या महिलांची झोप उडाली आहे.ऑनलाइन अर्ज भरण्याबरोबरच अंगणवाडी सेविकां मार्फतही महिलांना फॉर्म भरता येत आहेत.मात्र अॅप सुरूच होत नसल्याने सेतू सुविधा केंद्र चालकांची तसेच सेविकांचीही पंचाईत झाली आहे.
नारीशक्ती दूत हे अॅप दिवसभरात सुरू होत नाही तर काही वेळा रात्री अकरानंतर हे ‘अॅप’ चालते त्यामुळे अंगणवाडी सेविका रात्री जागरण करून जेवढे अर्ज भरता येतील तेवढे अर्ज भरून घेत आहेत.मात्र त्यासाठी अर्जदार महिलेला रात्री फोन करून तिच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ‘ओटीपी’ सेविकांना मागावा लागत आहे.नारीशक्ती दूत अॅप्लिकेशन सध्या तांत्रिक अडचणींमुळे व्यवस्थितरीत्या चालत नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकांनाही ऑनलाईन अर्ज भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय.दिवसभर अॅप चालत नसल्यामुळे रात्री उशिरा सेविकांना अर्ज भरण्याचे काम करावे लागत आहे.रात्री एक ते दोन वाजेपर्यंत हा फाॅर्म भरण्यासाठी खटपट करावी लागते.तसेच ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क बाबतीत अडथळे पार करून हे करावे लागत आहे.