“शेतकरी,मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु”- बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती
“मुख्यमंत्र्यांचा गणपती करू,समुद्रात उचलून टाकू” या विधानावर बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण
मुंबई -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि .७ ऑगस्ट २४ बुधवार
विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघामध्ये दौरे,बैठका,कामाचा आढावा राजकीय नेतेमंडळी घेत आहेत असे असतांनाच प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी काल सोमवारी हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता.राज्यातील दिव्यांगांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू आक्रमक झाले होते.यावेळी “मुख्यमंत्र्यांचा गणपती करू,समुद्रात उचलून टाकू” असे विधान बच्चू कडू यांनी केले होते या विधानावर आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे.“आम्ही आता आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत.प्रहारचा एक आमदार बच्चू कडू आणि दुसरा राजकुमार हे आहेत.आता येणाऱ्या निवडणुकीत आमचे जर २० आमदार निवडून आले आणि शेतकरी,मंजूरांच्या हिताचे निर्णय राज्यात झाले नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती करु असे माझ्या म्हणण्याचा अर्थ होता असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले,आमच्या दिव्यांग आणि शेतमजूरांच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून लोक येणार आहेत.दि.९ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आमचे आंदोलन असून आमचा मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी आहे.आता भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देत आहे आम्ही शेतकरी आणि शेतमजूरांचा नारा देत आक्रोश मोर्चा काढत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.हिंगोलीमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना बच्चू कडू म्हणाले होते की,“मुख्यमंत्र्यांचा आम्ही गणपती करू,उचलून थेट समुद्रात टाकू त्यासाठी तुमची साथ पाहिजे त्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे” असे म्हणत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला होता.तसेच विधानसभेमध्ये प्रहारचे फक्त दोनच आमदार आहेत तरीही ते घाम फोडल्याशिवाय राहत नाहीत असेही बच्चू कडू यांनी म्हटले होते.आमदार बच्चू कडू हे महायुतीमध्ये आहेत मात्र तरीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेत अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा केला होता तसेच बच्चू कडू यांनी अनेकदा महायुती सरकारवर टीकाही केली होती.विधानसभा निवडणुकीबाबत बोलतानाही त्यांनी अनेकदा सूचक विधान केलेली आहेत त्यामुळे त्यांची विधानसभेला काय भूमिका असणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.