“१० दिवसांत मला राज्यपाल केले नाही तर…” शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा
अमरावती -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि .७ ऑगस्ट २४ बुधवार
राज्यपालपदासाठी आठ-दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत कौर राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्राचे प्रकरण बाहेर काढणार ! असा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे.अडसूळ म्हणाले,नुकतीच राष्ट्रपती कार्यालयाने नव्या राज्यपालांची एक यादी प्रसिद्ध केली असून यात आठ ते दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये कुठेही माझे नाव नाही याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो व त्यांना आठवण करून दिली की आपल्याला त्यांनी (भाजपाने) काय आश्वासन दिले होते व सध्या मी संयम ठेवला आहे.अजून आठ-दहा दिवस संयम ठेवेन व थोडी वाट पाहणार आहे अन्यथा मी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करणार आहे असे आनंद अडसूळ यांनी म्हटले आहे.सदरहू त्यांच्या या विधानामुळे महायुतीत जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आनंदराव अडसूळ म्हणाले,भाजपाने आम्हाला निवडणुकीच्या आधी दिलेला शब्द पाळला नाही आणि ही वस्तुस्थिती आहे.त्यांनी निवडणुकी आधी आम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे.या सर्व वरिष्ठ मंडळींनी दिलेले आश्वासन पाळायला हव होते.शब्द देऊन ते (भाजपा) मागे फिरले आहेत.आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला.मी लोकसभा निवडणूक लढलो नाही.मी ती निवडणूक लढलो असतो पण आम्ही आश्वासन पूर्ण केले.मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो असतो आणि जिंकलो देखील असतो त्यानंतर आज मी कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून दिसलो असतो कारण माझ्या पक्षात मीच सर्वात वरिष्ठ आहे तसेच माझ्याकडे मंत्रिपदाचा याआधीचा अनुभव देखील आहे या सर्व गोष्टी असतांना मला डावलले याची माझ्या मनात चीड आहे व जे काही घडले त्याबद्दल माझ्या मनात खंत का असू नये ? तसेच त्यांना (भाजपा) वाटत असेल माझ्याकडे काय पर्याय आहे तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे.सध्याची परिस्थिती पाहता मी आणखी १०-१२ दिवस वाट बघेन व या १०-१२ दिवसांत काही घडले नाही तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.मला माहिती आहे न्यायालयात कशा पद्धतीने निकाल लागतात.परंतु माझ्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी सुनावणी केली तर काही अपेक्षा ठेवायला हरकत नाही तसेच आपल्याला न्याय मिळू शकतो असे विधान त्यांनी केले आहे.