नराधम पतीकडून पत्नी व पाच वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून ;
चार महिन्याचा चिमुकला आईच्या मायेला मुकणार !
बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा)
नराधम पतीनेच पत्नीसह पोटच्या ५ वर्षीय चिमुकल्याची हत्या केली आहे.ही खळबळजनक घटना बीड मधील मंजरथ गावातील काळेवस्ती येथे सोमवारी मध्यरात्री घडली.पांडुरंग दोडतले (वय ३२ वर्षे)असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतले (वय २७ वर्षे) आणि मुलगा पिल्या पांडुरंग दोडतले (वय ५ वर्षे) यांना निर्घृणपणे गळ्यावर आणि पोटावर वार करत संपविले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,लक्ष्मी दोडतले यांना एकूण ३ मुले आहेत.सर्वात लहान मुलगा केवळ ४ महिन्याचा आहे.लक्ष्मी यांचे आई-वडील ऊसतोडणीसाठी कारखान्याला गेले होते.त्यामुळे त्या कालच माहेरून सासरी आल्या होत्या.मात्र मध्यरात्री पतीने राक्षसी रूप धारण केले आणि ५ वर्षीय चिमुकल्यासह लक्ष्मी दोडतले यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली.या प्रकरणाची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पतीला अटक केली आहे.दरम्यान नराधम पांडुरंग दोडतले याने आपल्या पत्नीची आणि मुलाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.या घटनेने मंजरथसह माजलगाव तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करीत आहे.