बदलापूरच्या घटनेची नायगावमध्ये पुनरावृत्ती !! ७ वर्षीय चिमुकलीवर शाळेच्या कँटीन चालकाकडून लैंगिक अत्याचार !!
मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदीर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती नायगावमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेत उपहागृहात काम करणार्या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ७ वर्षांच्या चिमुकलीवर ४ ते ५ वेळा लैंगिक अत्याचार केला आहे.याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली आहे.
पीडित मुलगी या शाळेत दुसर्या इयत्तेत शिकते.दि.२२ ऑगस्ट रोजी ती शाळेतील कॅंटीनमध्ये जाण्यास तयार नव्हती.कॅंटीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असे तिने शिक्षिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना सांगितला त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केली तेव्हा मागील १५ दिवसांमध्ये शाळेच्या आवारात उपहारगृह (कॅंटीन) मध्ये काम करणारा १६ वर्षीय तरुण या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.विशेष म्हणजे एकदा मुलीने आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती परंतु त्यांनी तेव्हा गांभिर्याने घेतले नव्हते.मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी त्वरीत याबाबतची माहिती नायगाव पोलिसांना दिली.या प्रकरणाची माहिती मिळाताच आम्ही आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली आहे.
या शाळेत तिवारी नामक व्यक्ती कॅंटीन चालवतो.आरोपी असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून येथे काम करण्यासाठी आला होता.पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण (फुटेज) तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे.अन्य मुलींसोबत असा प्रकार घडला का त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत.मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी तयार नव्हते मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा प्रकार दडवून न ठेवता पोलिसांना माहिती दिली.आमच्या शाळेत मुलांच्या सुरक्षिततेची पुर्ण काळजी घेतली जाते.या शाळेत ६५ ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.घडलेला प्रकार दुर्देवी आहे त्यामुळे आम्ही स्वत:हून पोलिसांकडे तक्रार दिली असे मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी सांगितले.