पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ ऑगस्ट २४ शनिवार
पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली असून एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे.दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह तीनही प्रवाशी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. सदर हेलिकॉप्टर मुंबईहून हैदराबादच्या दिशेला जात होते मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे.सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हेलिकॉप्टरमधील तीन प्रवासी सुखरुप असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.
ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे हेलिकॉप्टर तीन प्रवाशांना घेऊन मुंबईतील जुहूमधून हैद्राबादकडे निघाले होते.पौड परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे.पौड-ताम्हिणी रस्त्यावर कोंढावळे गावाजवळ खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर भरकटले.वैमानिकाने प्रसंगावधान राखून कोंढावळे गावाजवळ उतरविण्याचा प्रयत्न केला.मुसळधार पाऊस आणि सर्व धुके पसरले असल्याने हेलिकॉप्टर उतरविताना कोसळले.या घटनेत पायलटला दुखापत झाली.हेलिकॉप्टरमधील तीन प्रवाशांना दुखापत झाली नाही.अपघातानंतर तीन प्रवासी घाबरलेले होते त्यांना पोलिसांनी धीर दिला अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.
हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.वैमानिक आनंद यांना दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.हेलिकॉप्टरमधील प्रवासी वीर भाटिया,अमरदीप सिंग,एस.पी.राम बचावले असल्याचे पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.