पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,मी नुकताच विदेश दौऱ्यावरून आलो व पोलंड येथे गेलो असतांना मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्राच्या लोकांचा आदर करतात.पोलंडमध्ये कोल्हापूर मेमोरियल आहे.कोल्हापूरच्या लोकांनी केलेली सेवा आणि योगदानाबाबत सन्मान व्यक्त करण्यासाठी हे स्मारक उभारले आहे.महाराष्ट्रातील महिलांचा गौरव व्यक्त करतांना ते म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांना दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम माता जिजाऊंनी केले.महिलांना जेव्हा सन्मान मिळत नव्हता तेव्हा सावित्रीमाई फुले पुढे आल्या.भारताच्या मातृशक्तीने समाज आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे.महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये मी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाईंची छाप पाहतो.लोकसभेला महाराष्ट्रात आलो तेव्हा बोललो होतो की,आम्हाला तीन कोटी बहि‍णींना लखपती दीदी बनवायचे आहे.बचत गटात काम करणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाहून अधिक असेल.मागच्या दहा वर्षात एक कोटी लखपती दीदी बनल्या आणि मागच्या केवळ दोन महिन्यात ११ लाख आणखी लखपती दीदी यात जोडल्या गेल्या.यात एक लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत.यात महायुती सरकारचे मोठे योगदान आहे.लखपती दीदी हे अभियान केवळ माता-भगिनींना लखपती बनविण्याचे अभियान नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांच्या आगामी पिढीला आर्थिक सक्षम करण्याचे एक महाअभियान आहे व या उपक्रमामुळे गावाचे अर्थचक्रही बदलत आहे असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि.२५ ऑगस्ट रोजी काही लखपती दिदींना प्रमापत्र वितरित करण्यात आली.बचत गटाना शासकीय बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे,त्यातून उद्योग सुरू करणे,नव्या उद्योगातून निर्माण होणाऱ्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे व या सगळ्यातून बचत गटाच्या माध्यमातून तीन कोटी लखपती दीदी तयार करणे हे केंद्र सरकारचे उद्दीष्ट असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.तसेच ते म्हणाले मागील दोन महिन्यांत आपण ११ लाख लखपती दिदी तयार केल्या असून एकट्या महाराष्ट्रात ही संख्या एक लाख आहे.दरम्यान कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे.पाठोपाठ महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर येथील एका शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे राज्यातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सुरक्षेवर बोलावे,बदलापूर,कोलकाता प्रकरणावर बोलावे,देशभरात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर बोलावे अशी मागणी होत होती अखेर जळगावातील कार्यक्रमात मोदी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलले.