दरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर नौदलाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गोव्याहून निघाले असल्याची माहिती चव्हाण यांनी काल सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गतवर्षीचा नौदल दिन मालवण येथे साजरा करण्यात आला होता.त्यानिमित्तानेच मालवण राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती.१५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती.अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसेच शिवप्रेमींचे आकर्षण केंद्र बनला होता.मात्र काल सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.पुतळा कोसळल्याचे वृत्त समजताच रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.समुद्राच्या पाण्याच्या खारट हवेतील कण जमा होऊन पुतळा कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला.मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच पुतळा उभारला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.मालवण पोलीस ठाण्यात कंत्राटदार कंपनी आणि पुतळ्याचे वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नौदलामार्फत काम या पुतळ्याची उभारणी कोणी केली यावरून सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती.सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह मालवण येथील या विभागाच्या कार्यालयात शिरून मोडतोड केली.मात्र या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे होती असा दावा राज्य सरकारने केला आहे.पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची असल्याचा दावाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.