Just another WordPress site

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कारभारास कंटाळून ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार

येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी प्रशासकीय कारभारास कंटाळुन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या यावल तालुका शाखेच्या वतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले असुन या संदर्भातील पत्र गटविकास अधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रात म्हटले आहे की,यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी या तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता स्वतंत्र निर्णय घेत असुन तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर अन्याय होत आहे.याबाबत गटविकास अधिकारी संघटनेच्या माध्यमातुन वारंवार पत्रव्यवहार करून देखील आपल्या माध्यमातुन ग्रामसेवकांना सहकार्य मिळत नसल्याचे दिसुन येत आहे.आपल्या पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवकांच्या ग्रामसेवक सभेला बसण्यासाठीची बैठक व्यवस्था ही मोळकळीस आलेल्या खुर्च्यांवर होत आहे.बैठकीच्या प्रसंगी या खुर्चीवरून ग्रामसेवक पडल्यास त्यास गंभीर स्वरूपाची दुखापत होवु शकते या विषयावरून देखील आपणास वारंवार सांगण्यात आल्यावर देखील जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या २९ जुलै २४ चे पत्रानुसार दफ्तर जमा करवायचे नमुद असतांना सुद्धा आपल्या अभिलेख कक्षातील कर्मचारी ज्यांनी जन्म,मृत्यु व विवाह नोंदणीचे दफ्तर स्विकारत नाही व ते ग्रामपंचायत स्तरावर दफ्तर अभिरक्षीत करण्याबाबतचे चुकीचा पत्रव्यवहार आपल्या कार्यालयातुन होत असल्याचे म्हटले आहे.सदर जन्म,मृत्यु नोंदणीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जळगाव व उपसंचालक आरोग्य सेवा तथा उपमुख्य निबंधक जन्म व मृत्यु महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील केन्द्र शासनजन्म व मृत्युनोंदणी अधिनियम ( सुधारीत ) २०२३ अनुसार कार्यवाही करण्याबाबत कुठलेही आदेश नसतांना आपण ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना चुकीचे आदेश देवुन त्यांच्यावर प्रशासकीय सेवेच्या नावाखाली अन्याय करीत असल्याची भावना ग्रामसेवकांच्या मनात निर्माण झाली आहे.गटविकास अधिकारी यांच्या अशा वागणुकीमुळे ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी व पंचायत समिती प्रशासन यांच्यात वाद निर्माण होत असल्याने संबधित अभिलेक कक्षातील कर्मचारी यांची तात्काळ तेथुन बदली करण्यात यावी जेणे करून ग्रामसेवक संघटना व पंचायत समिती प्रशासनातील वाद विकोपास जाणार नाही.अभिलेख कक्षातील कर्मचारी यांची सदर पत्रात जन्म,मृत्युअधिनियम २००० अनुसार कार्यवाही करण्याचे नमुद आहे.

तरी आपण जोपर्यंत ग्रामसेवक संघटनेस विश्र्वासात घेवुन प्रशासकीय काम करीत नाही तो पर्यंत ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन आपल्या कार्यालया विरूध्द सुरू राहील असे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले असुन या निवेदनावर महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष मजीत तडवी,सचिव लक्ष्मीकांत महाजन,उपाध्यक्ष रविन्द्र बाविस्कर,मानद अध्यक्ष शिवाजी सोनवणे,पी.व्ही.तळेले,महिला सदस्य सुषमा कोळी,बाळू वायकोळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.