“महाराजांच्या पुतळ्याचा खर्च २.४० कोटी…घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग” !! रोहित पवारांनी जाहीर केला खर्च
मुंबई – पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑगस्ट २४ गुरुवार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते मात्र हा पुतळा कोसळल्यामुळे आता राज्यात राजकारण तापले आहे. हा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधकांनी केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अनावरण करण्याच्या कार्यक्रमात किती खर्च झाला ? याची मिळवून ती जाहिर केली आहे.रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर ४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या खर्चाचा काही तपशील उघड केला आहे.यामध्ये ते म्हणाले,“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात २.०२ कोटी खर्च करण्यात आले. वारेSS व्वाSS सरकार ! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग !! असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.”
पंतप्रधान मोदी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे तीन हेलिपॅड उभारण्यात आले त्यासाठी ७८ लाख,४४ लाख अणि ७९ लाख प्रत्येकी हेलिपॅडवर खर्च करण्यात आले असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघाले आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेंबर २०२३ मध्ये देण्यात आल्या होत्या याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटारू हजर होते असाही आरोप रोहित पवार यांनी केला.तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का ? दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचे टेंडर काढले जाते का ? यावर संशोधन होणे गरजेचे आहे.राज्य सरकारने यावर उत्तर द्यावे असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीकडून २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देण्यात आली होती.यावेळी राजकोट किल्ल्यावर पाहणी करायला गेलेल्या शिवसेना उबाठा गट आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यात वाद झाला.दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर याठिकाणी दोन तास राडा सुरू होता.यानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे,शरद पवार आणि नाना पटोले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत १ सप्टेंबर रोजी निषेध आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.