Just another WordPress site

खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून त्यांच्या आईला लिहिलेले पत्र

काळजाला हात घालणाऱ्या ओळी व मन हेलावून टाकणारे पत्र

मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून आपल्या आईला लिहीलेले पत्र नुकतेच समोर आले आहे.या पत्रात संजय राऊत यांनी आपण हरलो नसून अन्यायाविरुद्ध लढण्यावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले आहे.या पत्रात संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे आणि आपल्या आईविषयी अनेक भावनिक उद्गार काढले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच संजय राऊत यांचे हे भावनिक पत्र शिवसेनेच्या दृष्टीने ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’गेमचेंजर ठरू शकते.संजय राऊत यांनी या पत्रातून आईपासून दुरावल्यामुळे मनाने हळवा झालेला मुलगा तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा शिवसैनिक अशी दोन रुपे दाखवून दिली आहेत.त्यांचे हे पत्र सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.

संजय राऊत यांच्या पत्रातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
१)आताच माझी ईडी कोठडी संपली.न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे.तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.
२)रविवारी १ ऑगस्ट रोजी ‘ईडी’चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे बसून होतीस.तुझ्या खोलीची व देवघराची तसेच किचनमधील मीठ,मसाले,पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस हा प्रसंग आपल्यावर येणारच आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस.पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला!बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते.त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला.’लवकर परत ये’ म्हणालीस,खिडकीतून मला हात केलास.जसा तू रोज सामनात किंवा दौऱ्यावर जाताना करतेस.त्या कठीण परिस्थितीतही अश्रु रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास.मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता,आई,मी नक्कीच परत येईन.

३)महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहज कोणाला मारता येणार नाही.देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत.काही जण तर कधीच येत नाहीत तर अशी असते.मलाही अन्यायापुढे,शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही.अन्यायाविरोधात मी लढा देत आहे.म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले.हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही काय?
४)भुजबळ,राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ला करु लागला तेव्हा काहीतरी करा,शिवसेना वाचवा असे सांगणारी तूच होतीस.”हे लोक का फुटले? यांना काय कमी पडले होते?असा प्रश्नही तु पाहून विचारीत होतीस.शिवसेना वाचवायची,टिकवायची म्हणजे लढावेच लागेल.

५)शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले.मन्हाठी बाणा मी तुझ्याकडूनच शिकलो.शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही हे तूच आमच्या मनावर कोरलेस!मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात संजय कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू?मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते.
६)’ईडी’, ‘इन्कम टॅक्स’ कौरच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले.मला बेमानांच्या यादीत जायचे नाही,कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे.माझ्यात ती हिंमत आहे.ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस.सगळ्यांना माहीत आहे,माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले.इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकरेंची साथ सोडा असे सुचवले जात आहे.याच प्रकारचा जुलूम टिळक,सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला.अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले,जायबंदी झाले,प्राण गमावले.मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा?का झुकावे?उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत.अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?

७)जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे.आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका,महाग पडेल,अशा धमक्या होत्या.अशा दया आणि धमक्यांना  मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून दूर आहे.तरीही चिंता नसावी,मी येईनच तोपर्यंत उद्धव असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील.काळजी घे!

Leave A Reply

Your email address will not be published.