मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ सप्टेंबर २४ गुरुवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली असून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यवधी अर्ज आल्याने सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.ऑगस्ट महिन्यात सरकारने संकेतस्थळ कार्यान्वित केले होते तर निकषही शिथिल करण्यात आले होते त्यामुळे अनेक महिलांनी या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केले परंतु आता नारी शक्ती दूत अॅप आणि संकेतस्थळ तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे महिलांनी कुठे अर्ज करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत.जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून अनेकजण सन्माननिधीच्या प्रतिक्षेत आहेत तर सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यात येत आहेत परंतु आता फक्त अंगणवाडी सेविकाच अर्ज भरू शकणार आहेत.नारी शक्ती अॅप आणि संकेतस्थळ बंद असल्याने जवळच्या अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत हे अधिकार आता अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आले आहेत.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ मध्येही या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली.या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका,समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”,मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager),आशा सेविका,सेतू सुविधा केंद्र,आंगणवाडी पर्यवेक्षिका,ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होते मात्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत.या निर्णयानुसार आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.अंगणवाडी सेविका महिलांकडून अर्ज भरून घेणार असून अर्जांची छाननी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकाच त्याची नोंदणी ऑनलाईन करणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालकडून मिळाली त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडीत जाऊन सेविकांशी संपर्क साधा.