मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्रामने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.अहेरी विधानसभेत त्या वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले जाते.मुलीच्या बंडानंतर वडील धर्मराव बाबा आत्राम यांनी अतिशय कठोर शब्दात मुलीवर टीका केली आहे तसेच काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनसन्मान यात्रेनिमित्त गडचिरोलीचा दौरा केला असताना भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर भाष्य केले होते.आता भाग्यश्री आत्राम यांनी अजित पवारांवर टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान रॅलीला संबोधित करताना अजित पवार भाग्यश्री आत्राम यांना उद्देशून म्हणाले होते की,तुम्ही तुमच्या वडिलांना पाठिंबा द्यावा आणि त्यांना जिंकण्यासाठी मदत केली पाहिजे कारण त्यांच्याकडेच या प्रदेशाचा विकास करण्याची क्षमता आणि दृष्टीकोन आहे तसेच वस्ताद नेहमी एक डाव स्वतःकडे राखून ठेवत असतो हे लक्षात ठेवा.समाज कधीही कुटुंबातील फूट स्वीकारत नाही.मी ही तेच अनुभवले आहे. मी माझी चूक मान्य केली आहे.

भाग्यश्री आत्राम म्हणाल्या,अजित पवार यांनी गडचिरोलीत येऊन मला ज्ञान शिकवत आहेत.तुम्ही इतके अनुभवी आहात मग तुम्ही जेव्हा शरद पवारांना सोडून गेलात तेव्हा घर फुटत आहे हे तुम्हाला कळले नाही का ? आज तुम्ही मला कोणत्या तोडांना सांगत आहात की घर सोडू नका. आधी तुम्ही मान्य करा की तुम्ही घर फोडले आहे.मी घर फोडून आलेले नाही.धर्मराव बाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी जेव्हा अपहरण केले होते तेव्हा शरद पवारांनीच मध्यस्थी करून त्यांना सोडवले होते.शरद पवारांचे आमच्या कुटुंबावर उपकार आहे.आज मी त्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहे.धर्मराव बाबा आत्राम यांची साथ सोडल्यानंतर मला घरातून बाहेर काढण्यात आले आहे.दोन कपड्याच्या जोडीसह मी बाहेर पडले असून आता जनताच माझे भवितव्य ठरवेल असेही भाग्यश्री आत्राम म्हणाल्या.आम्ही बाप-लेक एकत्र नाहीत.लोकांनी याबाबत गैरसमज बाळगू नये असेही आवाहन त्यांनी केले.

दरम्यान भाग्यश्री अत्राम यांनी भाषा सुधारायला हवी अशी टीका धर्मराव बाबा अत्राम यांनी केली आहे.“माझा त्यांना पूर्ण आशीर्वाद आहे.त्यांची भाषा सुधारली पाहिजे.त्या राजकारणात नवीन आहेत.इतकी वर्षं सोबत होत्या त्यांनी काहीतरी शिकले पाहिजे होते ठीक आहे.आवेशात बोलल्या असतील किंवा कुणीतरी सांगितल्याने बोलत असतील.नवीन पिढीत काहीतरी करण्याचा उत्साह असतो.चांगले आहे पण आपण बोलत असताना मर्यादा ठेवून बोलले पाहिजे हे मी त्यांना शिकवू शकलो नाही ही माझी चूक आहे” अशा शब्दांत त्यांनी लेकीवर टीका केली आहे .