पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा व वाद निर्माण झाले आहेत.आधी योजनेसाठीचे पात्रता निकष,नंतर त्यावर विरोधकांनी केलेली टीका आणि आता महायुती मधल्याच मित्रपक्षांमध्ये योजनेचे श्रेय घेण्यावरून चढाओढ निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.भारतीय जनता पक्ष,अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट या तिन्ही घटक पक्षांकडून लाडकी बहीण योजनेबाबत दावे केले जात आहेत.अजित पवार गटाकडून तर व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली असून त्यात त्यांनीच ही योजना दिल्याचा दावा करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लाडकी बहीण योजनेवरून स्पष्ट भूमिका मांडली आहे.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ठराविक निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना मासिक १५०० रुपये दिले जाणार आहेत व या योजनेची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली.योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असे असतांना मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी पक्षांकडूनच ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख होत असल्याचे दिसत आहे.यासंदर्भात आज माध्यम प्रतिनिधींनी शंभूराज देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असे नाव घेण्यास सांगितले.शंभूराज देसाई आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला आले होते यावेळी माध्यम प्रतिनिधींनी ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करताच शंभूराज देसाईंनी त्यात सुधारणा सांगितली.“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ म्हणा.तुम्हीही सरकारी नाव जे आहे तेच घेत जा” असे  सांगितले.

कालपासून इतर लोकही हे नाव घ्यायला लागले आहेत.नवीन योजना होती त्यामुळे बऱ्याचदा अनावधानाने फक्त लाडकी बहीण योजना असे नाव घेतले जायचे पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करतांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा करत आहेत. दोन दिवस मी मतदारसंघातल्या १५-२० गावांमध्ये १००-१२५ महिलांना या योजनेसंदर्भात भेटलो व त्याचे व्हिडीओही आहेत.महिलांना जर विचारले की ही योजना कुणी आणली ? तर त्या स्पष्ट सांगत आहेत की एकनाथ शिंदेंनी आणली त्यामुळे महिलांमध्ये हे नक्की आहे की ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आणली आहे असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.दरम्यान योजनेचा गैरवापर होत असल्याबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.अशा प्रकरणांची चौकशी चालू आहे.महिला लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी नेमले होते पण जेव्हा अशा बाबी लक्षात आल्या तेव्हा फक्त अंगणवाडी सेविकांच्या मार्फतच फॉर्म भरून घेतले जातील असे नियोजन केले आहे.ज्यांनी कुणी एवढ्या चांगल्या योजनेत चुकीची नावे,फॉर्म भरून,फोटो लावून गैरप्रकार केलेत त्याची चौकशी करण्याचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत असे शंभूराज देसाई म्हणाले.दरम्यान राज्यात सरकार आल्यास एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय.आमचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे मी गणरायाला घातले आहे पण मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय वरीष्ठ नेते बसून घेतील असे शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.