“मोठ्या अपेक्षेने भाजपात गेलो होतो पण…” माजी आमदारांची काँग्रेसमध्ये घरवापसी !! “बंडखोर आमदारांना महायुती सरकारची साथ” भाजपातील वागणुकीवर ठेवले बोट
गोंदिया-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार
विधानसभा निवडणुकांचे वारे महाराष्ट्रात वाहू लागले असून विविध पक्षांकडून शक्ती आजमावली जात आहे.इच्छुकांच्या इच्छा व जागावाटपाची चर्चा या गोष्टी एकाच वेळी घडतांना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांमधून होणारी पक्षांतरंही चर्चेचा विषय ठरत आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नाव व काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अगरवाल यांची भाजपामधून पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे.२०१९च्या निवडणुकीत या भागात भाजपाचा जोरदार प्रचार करणारे गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून भाजपावर टीकास्र सोडले आहे.गोपालदास अगरवाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित होताच भाजपावर टीका केली आहे.पाच वर्षांपूर्वी मी मोठ्या अपेक्षेने व या भागाच्या विकासाची हमी घेऊन भाजपात गेलो होतो.पण आमच्याकडच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच भाजपाचा पराभव करण्याचे काम केले तरीही मी गेल्या पाच वर्षांत इमानेइतबारे भाजपाचे पूर्ण निष्ठेने काम केले असे गोपालदास अगरवाल म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद,लोकसभा निवडणुकांमध्येही मी गोंदियात न भूतो न भविष्यती असे मोठे मताधिक्य भारतीय जनता पक्षाला मिळवून देण्याचे काम केले पण तरीही गेल्या ५ वर्षांत भाजपामध्ये माझ्याप्रती विश्वास व सहकार्याची भावना मला खूप कमी दिसली असा आरोप अगरवाल यांनी केला आहे.दरम्यान स्थानिक बंडखोर आमदारांना भाजपाप्रणीत महायुती सरकारची साथ मिळत असल्याचा आरोपही अगरवाल यांनी केल.माझ्यासमोर उभे राहिलेल्या बंडखोर आमदारांना भाजपा सरकारची पूर्ण साथ मिळत आहे त्यामुळे मला वाटते की या भागात फक्त लूट चालू आहे.कोणताही चांगला उपक्रम इथे सुरू होऊ शकला नाही.आमच्याकडच्या सिंचन प्रकल्पांना चालना देण्याचे कोणतेही काम झाले नाही अशी तक्रारही त्यांनी बोलून दाखवली.दरम्यान जागावाटपामध्ये काँग्रेसने गोंदियाची जागा स्वत:कडे घ्यावी अशी मागणी गोपालदास अगरवाल यांनी केली आहे.माझी एकच मागणी आहे की काँग्रेसने गोंदियातून लढायला हवे.मविआच्या सर्व घटक पक्षांनी गोंदियात विजय मिळावा यासाठी काँग्रेसला उमेदवारी दिली पाहिजे.मीही इच्छुक असणार आहे.पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे.पाच वर्षांपूर्वी माझ्यामुळेच काँग्रेसला आमच्या विधानसभा क्षेत्रात गोंदिया जिल्ह्यात फटका बसला होता त्यामुळे मी परत काँग्रेसमध्ये येत असतांना खर्गे,नाना पटोले यांच्याकडून खात्री घेतली आहे की गोंदियातून काँग्रेस निवडणूक लढणार.उमेदवार कुणीही असो.गोंदिया हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असे ते म्हणाले.
मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जात नाही.मविआचे ज्येष्ठ नेते शरद पवार आमचे राजकीय गुरू राहिले आहेत त्यांनीही मला सांगितले की गोंदिया काँग्रेसचा बालेकिल्ला आहे त्या दृष्टीने तुम्ही विचार करा.प्रफुल्ल पटेल काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांचा बालेकिल्ला होता व आता हा पक्षाचा बालेकिल्ला आहे.आत्तापर्यंत इथे १४ निवडणुकांपैकी ११ निवडणुकांमध्य काँग्रेसचा विजय झाला आहे.गेल्या निवडणुकीत माझ्यामुळेच काँग्रेसची पीछेहाट झाली पण यावेळी आम्ही मोठ्या मताधिक्याने काँग्रेससाठी विजय मिळवणार असे ते म्हणाले.