“…तर नितीश कुमार-चंद्राबाबू पाठिंबा काढून घेतील अन मोदी सरकार कोसळेल” !! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग" !! पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
“आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झाले तर केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार देखील पडेल” असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.केंद्रातील मोदींचे सरकार हे नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देशम पर्टीच्या पाठिंब्यावर उभे आहे.मात्र “नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू भाजपाला सोडून जातील” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.ते म्हणाले,अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ महिन्यांत कोसळले होते त्याचप्रमाणे मोदींचे सरकारही कोसळेल. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,तुम्ही (महाराष्ट्रातील जनता) महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले तर दिल्लीतले मोदींचे सरकार फार दिवस टिकणार नाही.हरियाणा राज्यात सत्तांतर होत आहे त्यामुळे आता केंद्रातील मोदींची खुर्ची डळमळीत झाली आहे.विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र व हरियाणातील सत्तांतर पाहून चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे मोदींना सोडून जातील.अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ महिन्यांमध्ये कोसळले होते.भारतात लवकरच त्याची पुनरावृत्ती होताना तुम्हाला दिसेल.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा गेल्या आठवड्यात केला होता.महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत व या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे.माजी मुख्यमंत्री म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण,बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील बलात्काराची घटना व राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे जनतेच्या मनात सरकारविषयी प्रचंड रोष आहे.पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत.गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.भाजपाला निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.