उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ सप्टेंबर २४ शनिवार
अयोध्येतील राम मंदिर परिसरात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या एका दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे आणि आत्तापर्यंत पाच जणांना या प्रकरणात अटक केली आहे.पीडितेने कँट पोलीस ठाण्यातल्या पोलिसांवरही काही गंभीर आरोप केले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२ सप्टेंबरला पीडितेने आमच्या पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार नोंदवली.पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ती तिच्या मित्रांकडे गेली होती,विविध तारखांना गेली होती त्यावेळी तिच्यावर तिच्या मित्रांनी आणि त्या मित्रांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला.आत्तापर्यंत आम्ही या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे,इतरांचा शोध आम्ही घेत आहोत अशी माहिती पोलीस अधीक्षक मधुवन सिंह यांनी दिली आहे.
पीडितेने असे म्हटले आहे की,एका तरुणाशी माझे प्रेमसंबंध होते व त्याने आणि त्याच्या इतर मित्रांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ तयार केला तसेच त्याद्वारे मला ब्लॅकमेल करुन विविध ठिकाणी बोलवून अनेक दिवस सामूहिक बलात्कार केला.मी दि.२ सप्टेंबरला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पण पोलिसांनी मला माध्यमांपासून दूर राहा,तुझ्या कुटुंबीयांनाही बजावून सांग अशी धमकी दिली असेही या पीडितेने म्हटले आहे.पीडिता म्हणाली,मी श्रीराम मंदिर परिसरात स्वच्छता करण्याचे काम करते मात्र माझ्याबरोबर जी घटना घडली त्यामुळे माझे कामही सुटले आहे.माझी एका तरुणाशी ओळख झाली व त्याच्याशी माझे प्रेमसंबंध जुळून आले त्यानंतर एक दिवस तो त्याच्या मित्रांना घेऊन आला आणि त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.मी त्याला धुडकावून पळून जात होते तेव्हा मी खाली पडले आणि माझ्या डोक्याला लागले ज्यामुळे मी बेशुद्ध झाले.मी बेशुद्ध असतांना माझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.त्यानंतर मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिथे वंश चौधरी आणि विनय हे दोघे होते ज्यांनी मला गेस्ट हाऊसवरुन गॅरेजवर नेले व तिथेही माझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ शूट केला.त्यानंतर मला ते ब्लॅकमेल करु लागले असे या तरुणीने तक्रारीत सांगितले.
तसेच तरुणी पुढे म्हणाली,व्हिडीओ पोस्ट करण्याची धमकी देत ते लोक मला वारंवार ब्लॅकमेल करत होते आणि माझ्यावर बलात्कार करत होते.मला २२ ते २४ तारीख अशा दोन दिवशी तर त्यांनी सोडलेच नाही यानंतर मी २८ ऑगस्टला पोलीस ठाण्यात जात होते पण मला धमकी देण्यात आली.मला सांगितले की तू पोलिसात गेली तर आम्ही तुझ्या बहिणींवरही बलात्कार करु तसेच तुझ्या घरातल्यांनाही आम्ही सोडणार नाही.मी पोलिसांकडे दाद मागायला आले तेव्हा मला ३६ तास बसवून ठेवण्यात आले तसेच मला FIR ची कॉपीही देण्यात आली नाही असाही आरोप या तरुणीने केला आहे याबाबत आज तकने या संदर्भातले वृत्त दिले आहे.