यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार
येथील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या एका महीलेच्या घरात शिरून विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन या घटनेची यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,शहरातील साने गुरुजी माध्यमीक विद्यालयाच्यामागे असलेल्या गाडगेनगर वस्तीत राहणारी निर्मलाबाई शंकर वडर वय ५६ वर्ष हे दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरात असतांना अचानक त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मध्यभागी अत्यंत विषारी सापाने दंश केल्याने त्या बेशुद्ध पडल्या.दरम्यान कुंटूबातील मंडळीच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांना नरेन्द्र शिंदे व ईतर समाज बांधवांनी तात्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतांना डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सर्पदंश झालेल्या निर्मलाबाई वडर यांना मृत घोषीत केले.मयत निर्मलाबाई वडर यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सदर घटनेची खबर मयताचा मुलगा रवीन्द्र शंकर वडर वय ३० वर्ष यांनी यावल पोलीस ठाण्यात दिल्यानुसार अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेन्द्र पवार हे करीत आहे.