यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ सप्टेंबर २४ मंगळवार
तालुक्यातील दहीगाव येथे गेल्या एक महिन्यापासून विरावली-दहिगाव रस्त्यावर काँक्रीट करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नागरीकांना सदरच्या कामामुळे रहदारीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.सदरचे काम हे जलदगतीने त्वरित पुर्ण व्हावे आणि कोलमंडलेली बस सेवा सुरू करावी अशी मागणी या कामामुळे त्रस्त झालेले ग्रामस्थ करीत आहेत.
दरम्यान यावलकडून सावखेडा सिमकडे जाणाऱ्या दहीगाव गावातुन गेलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सद्या सुरू असुन सदरचे काम हे गावातील प्रमुख मार्गावर सुरू आहे.दरम्यान सदर काम हे अत्यंत संथ गतीने होत असल्याने दहिगावकरांना रहदारीला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्याचबरोबर सदर काम सुरू असल्याने हा दुतर्फ रस्ता बंद करण्यात आलेला आहे व एकतर्फी रस्ता असूनही त्या रस्त्यावर काही वाहने लावलेले असतात त्या वाहनांमुळे एकतर्फी रस्त्यावरून वाहन जाणे बंद आहे.परिणामी यावल आगाराने दहिगाव सौखेड्यासाठी सुरू असलेली बस सेवा गावापर्यंत बंद करण्यात आलेली आहे.गावाच्या बाहेर सुरेश आबा नगर पर्यंत निम्मे फेऱ्या सुरू ठेवलेल्या आहेत त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.एकतर्फी मार्गावर लावण्यात आलेल्या वाहनांवर बांधकाम विभागाने बंदी घालावी व सदरचे संथगतीने होणाऱ्या कामास तात्काळ पुर्ण करून हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.