अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार
आईच्या गैरहजेरीत स्वतःच्याच चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने बारा वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.संगमनेर शहर पोलीस ठाण्यात २९ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून नराधम बापाविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी केला होता.या घटनेमुळे संगमनेरसह जिल्हाभरात खळबळ उडाली होती.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी आरोपी विरोधात संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते.न्यायाधीश घुमरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली.सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले.या खटल्यात त्यांना ॲड.स्मिता सस्कर यांनी सहाय्य केले.खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.पीडित मुलगी,फिर्यादी,अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गहिनीनाथ खेडकर,संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.छाया लोहारे यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.अतिरिक्त सरकारी वकील गवते यांनी या खटल्यात सक्षम पुरावा न्यायालयासमोर आणत जोरदार युक्तिवाद करत आरोपीला शिक्षेची मागणी केली.सरकार पक्ष आणि आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश घुमरे यांनी आरोपीला दोषी ठरवत १० वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड,कलम ३७६(२)(N) नुसार बारा वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड,पोक्सो कलम ६ नुसार बारा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. आरोपीने सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याने आरोपीला बारा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागेल.सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे,महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा थोरात,पी.एस.साबळे,दिपाली राहणे व स्वाती नाईकवाडी यांनी या खटल्यात सरकार पक्षाला सहाय्य केले.