यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ सप्टेंबर २४ शनिवार
इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वजन पावतीवर संबंधित मालधारकाचे नाव नसल्याने व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने शेतीमालाच्या वजन पावतीवर शेतकऱ्यांनी आपले नाव व पत्त्याची नोंद करावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश वसंत फेगडे यांनी नुकतेच एका निवेदनाद्वारे केले आहे.
सदरील निवेदनात म्हटले आहे की,इलेक्ट्रॉनिक तोल काट्यावर शेतकऱ्यांच्या शेतीमालाने भरलेले ट्रॅक्टर,ट्रेलर,ट्रक व इतर लहान-मोठ्या वाहनाचे वजन केले जाते.त्यामध्ये प्रामुख्याने कापूस,भरड धान्य,कडधान्य,तेलबिया,कांदा व मुख्यत: केळी या उत्पादनाचे वजन होऊन वजनाची पावती दिली जाते.मात्र शेतकऱ्यांद्वारे शेतीमालाच्या वजन पावत्यावर मालधण्याचे,व्यापारी,दलाल इत्यादी खरेदी दाराचे व विक्रेत्याचे गाव व पत्ता नोंद केलेला आढळून येत नाही अशा प्रसंगी शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडून फसवणूक झाल्यास शेतकऱ्याकडे असलेल्या पावतीवर विक्रेता व खरेदीदाराचे नाव व पत्ता नसल्याने व्यवहार केल्याचा व माल मोजण्याचा पुरावा राहत नसल्याने शेतकऱ्याला आपले पैसे वसूल करणे, फसवणुकीचा गुन्हा पोलिसात नोंदविणे व न्याय मागणी अडचणीचे ठरते व याचाच गैरफायदा घेत अनेक खोटे व्यापारी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन फसवणूक करतात असे निदर्शनास आले आहे.दरम्यान वजन व माप मानक अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार आपण देत असलेल्या मापनाच्या पावतीवर खरेदीदार व विक्रेता यांची नाव,गाव,पत्ता याची खरीखुरी नोंद ठेवणे ही आपली जबाबदारी आहे व माप झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या पावतीवर शेतकरी तसेच व्यापारी,अडते,दलाल,मध्यस्थ यांनी नाव,गाव व पत्त्याची नोंद करावी तसेच नोंदीचे स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यात यावे परिणामी तसे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा कडक इशारा बाजार समितीचे सभापती राकेश वसंत फेगडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.