“शाळांमध्ये गौतम अदाणींचा फोटो लावायची तयारी सुरू” !! राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसची टीका !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ सप्टेंबर २४ रविवार
चंद्रपूरमधील घुग्घुस येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटी संचालित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा,घुग्घुस या इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक (१ ली ते १२ वी) शाळेचे अदाणी फॉउंडेशन,अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.अदाणी फाऊंडेशन आता या शाळेचे व्यवस्थापन पाहणार आहे.हा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तसेच राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राचा ७/१२ अदाणींच्या नावे करणार आहे का ? तसेच शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांबरोबरच आता गौतम अदाणी यांचाही फोटो लावायची तयारी शिंदे,फडणवीस व अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
वडेट्टीवार यांनी शासन निर्णयाची प्रत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे व यामध्ये म्हटले आहे की,सदर शाळेचे व्यवस्थापन अदाणी फाऊंडेशन,अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासह काही अटी वर शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की “महाराष्ट्राचा ७/१२ अदाणींच्या नावे लिहिणार का महायुती सरकार ? महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदाणींचा देखील आहे.विमानतळ झाले,वीज, धारावी आणि मुंबईतील जमिनी देखील दिल्या,आता शाळांवर पण अदाणींचा डोळा आहे.महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ अदाणी अँड कंपनीला द्यायचा ठरवले आहे का ? वडेट्टीवार म्हणाले,शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांबरोबरच आता गौतम अदाणीं यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे,फडणवीस व अजित पवार सरकारकडून सुरू झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.