अशीही श्रद्धांजली !! जो पुरस्कार प्रदान केला त्याला देण्यात आले रतन टाटांचे नाव !! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० ऑक्टोबर २४ गुरुवार
रतन टाटा यांचे काल दि.९ ऑक्टोबर बुधवार रोजी रात्रीच्या सुमारास निधन झाले त्यानंतर त्यांच्याबाबत अनेकजण पोस्ट करत आहेत.उद्योग विश्वाला एक आदर्श घालून देणारे पितामह म्हणून रतन टाटांकडे पाहिले जात होते.रतन टाटांच्या आठवणी सोशल मीडियावर सांगितल्या जात आहेत तर राज्य सरकारने रतन टाटांना आदरांजली वाहताना एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.राज्य सरकारने जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर गत वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य,कला,क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी आता ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येत आहे.महाराष्ट्र शासनाचा हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता.राज्य शासनाने या पुरस्काराचे नाव बदलून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या पुरस्काराचे पहिले मानकरी रतन टाटाच होते.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.रतन टाटांना राज्य शासनाकडून अशा रितीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा यांना भेटावे पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झाले त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो अशी आठवणही उदय सामंत यांनी सांगितली. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची प्राणज्योत ९ ऑक्टोबर या दिवशी मालवली.ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवत होत्या.उद्योग जगतातील दयाळू व्यावसायिक अशी त्यांची प्रतिमा होती.त्यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यांच्या निधनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.आता महाराष्ट्र सरकारने रतन टाटांचे नाव उद्योगरत्न पुरस्काराला देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय,सामाजिक आदी विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत तसेच एनसीपीए ते वरळीतील स्मशानभूमी दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेता एनसीपीएपासून वरळीपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे डॉ. ई.मोझेस मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.वरळी नाका ते रखांगी चौकपर्यंत डॉ.ई.मोझेस मार्ग बंद ठेवण्यात येणार असून दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.या कालावधीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या वाहनांशिवाय इतर वाहनांना ई.मोझेस मार्गावर प्रवेश करता येणार नाही.