हजारीराम बिश्नोई (७०) आणि त्यांची पत्नी चावली देवी (६८) राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात राहत होते.करणी कॉलनीमधील त्यांच्या घरातील पाण्याच्या टाकीत दोघांचाही मृतदेह काल गुरुवारी (१० सप्टेंबर) आढळून आला.या वृद्ध दाम्पत्याला दोन मुले आणि दोन मुली असे चार अपत्य आहेत.आत्महत्या करण्यापूर्वी दाम्पत्याने चिठ्ठी लिहिली,त्यात मुलगा राजेंद्र आणि सुनीलवर गंभीर आरोप केले आहेत.दोघांनीही संपत्तीच्या वादातून अनेकवेळा मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.फक्त मुलेच नाही तर मुलींनीही आई-वडिलांना धमकावले होते.जर हा प्रकार बाहेर कुणाला सांगितला किंवा तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला तर झोपेतच जीवे मारून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचे दाम्पत्याने चिठ्ठीत लिहिले.मुलगा राजेंद्र आणि त्याची पत्नी रोशनी,दुसरा मुलगा सुनील आणि त्याची पत्नी अनिता तसेच दोन मुली मंजू आणि सुनीता आणि काही नातेवाईकांची नावे चिठ्ठीत लिहून ठेवली आहेत.वृद्ध दाम्पत्याच्या नावावर असलेली सर्व संपत्ती मुलांना स्वतःच्या नावावर करून हवी होती यासाठी त्यांचे काही नातेवाईक मुलांना मदत करत होते असा आरोप चिठ्ठीत करण्यात आला आहे. मुलांसाठी बिश्नोई दाम्पत्याने आधीच तीन प्लॉट त्यांच्या नावावर केले होते तसेच त्यांची गाडी फसवणुकीने नावावर करून घेतली होती.

बिश्नोई दाम्पत्याने चिठ्ठीत लिहिले की,आमच्याकडून सर्व काही घेऊन मुले आणि त्यांच्या पत्नी आम्हाला उपाशी ठेवत होते.सुनीलने एकदा फोन करून सांगितले की,कटोरा घ्या आणि भीक मागा.मी तुम्हाला जेवण देणार नाही व याची वाच्यता कुठे कराल तर मी तुम्हाला मारून टाकेन. नागौरचे पोलीस अधीक्षक नारायण टोगस यांनी सांगितले की,आम्हाला वृद्ध दाम्पत्य हरवल्याची तक्रार मिळाली त्यानुसार तपास केला असता पाण्याच्या टाकीत दोघांचा मृतदेह आढळून आला.फॉरेन्सिक पथकाला तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे तसेच घरातील सीसीटीव्हीचे चित्रण तपासले जात आहे.यादरम्यान घराच्या भिंतीवर सुसाईट नोट चिकटवल्याचे आढळून आले.