जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ ऑक्टोबर २४ शनिवार
मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील नेरी येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे.काल शुक्रवारी (११ ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी जामनेरकरांसमोर देवेंद्र फडणवीस म्हणाले,“आम्ही २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजनांना उमेदवारी देणार नाही तसेच यंदाच्या निवडणुकीत गिरीश महाजन यांनी केवळ उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि महाराष्ट्रभर भाजपासह महायुतीचा प्रचार करावा त्यानंतर थेट मतदानाच्या दिवशी मतदारसंघात यावे जामनेरकरांनी त्यास पाठिंबा द्यावा”.देवेंद्र फडणवीस म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे.या निमित्ताने जामनेर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहिला आहे.हा पुतळा आम्हाला स्वातंत्र्य काय असते,स्वराज्य काय असते,स्वाभिमान काय असते ते दाखवून देत राहील तसेच ज्यांनी आम्हाला समता आणि बंधुता शिकवली,जगातील सर्वोत्तम संविधान आम्हाला दिले त्या बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा येथे तयार झाला आहे.हा पुतळा आम्हाला बाबासाहेबांच्या शिकवणीची आठवण करून देत राहील.हे दोन पुतळे उभारल्याबद्दल मी जामनेरकरांनो तुमचे आणि मंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून अभिनंदन करतो यासह अनेक लोकोपयोगी कामांचे आज या ठिकाणी लोकार्पण होत आहे त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,या कार्यक्रमाला येण्यामागे माझा एक स्वार्थ देखील आहे.आपल्या सर्वांना माहिती आहे की गिरीश महाजन हे आमचे संकटमोचक आहेत.आता काही लोक म्हणत आहेत की गिरीश महाजन यांना आम्ही जामनेरमध्येच पाडणार परंतु हे अशक्य आहे.या मतदारसंघात गिरीश महाजन यांच्यापेक्षा जास्त मते येऊ शकेल अशी एकच व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे आमच्या साधना वहिनी (मंत्री गिरीश महाजन यांचा पत्नी).आम्ही साधना वहिनींना या मतदारसंघात उभे केले तर त्यांना गिरीश महाजनांपेक्षा जास्त मते मिळतील त्यामुळे मी गिरीश महाजन यांना आज एक गोष्ट सांगेन.तुम्ही यावेळी लढून घ्या परंतु २०२९ मध्ये साधना वहिनीच या मतदारसंघातून निवडणूक लढवतील तेव्हा आम्ही गिरीश महाजन यांना तिकीट देणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.