Just another WordPress site

‘मापात पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार

काही शिधावाटप दुकानदार सर्वसामान्यांच्या ठरावीक हिश्श्यातील धान्याची लूट करीत असल्याच्या तक्रारीनंतर दोषी दुकानदारांवर कारवाईसाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली असून यात चौकशीनंतर शहरी भागांमधील सहा शिधावाटप दुकानांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे शिवाय एकूण नऊ अधिकृत शिधावाटप दुकाने निलंबित करण्यात आली.यात लाभार्थींना कमी वजनाचा शिधा, वेळेत शिधा देण्यास टाळाटाळ,लाभार्थींशी गैरवर्तन,अफरातफर असे अनेक प्रकार आढळून आले आहेत.दुकानदारांकडून पाच लाख नऊ हजार ७४० रुपये किमतीचे शिधा जिन्नस जप्त करण्यात आले आहे.ठाणे जिल्ह्यात ६ लाख ३५ हजार १०८ शिधापत्रिकाधारक आहेत यात अंत्योदय लाभार्थींची संख्या १२ हजार ६२७ तर प्राधान्य लाभार्थींची संख्या ६ लाख २२ हजार ४८१ आहे.शासन अंत्योदय शिधाधारकांना दरमहा प्रति शिधापत्रिकास ३५ किलो धान्य पुरवते तर प्राधान्य लाभार्थींना दरडोई पाच किलो धान्याचा पुरवठा केला जातो.ठरावीक हिश्श्याहून कमी धान्य देऊन फसवणूक केली जात असल्याचे आरोप लाभार्थींनी केले होते.शासन लाभार्थींना हक्काचा शिधा योग्य प्रमाणात पुरवत असले तरी दुकानदार कमी धान्य पुरवत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

याबाबत जाब विचारल्यास शासनच कमी धान्य देत असल्याचे कारण शिधावाटप दुकानदार करीत असल्याचे लाभार्थींनी तक्रारीत म्हटले होते. या बेजबाबदार वर्तन,मनमानी आणि अन्नधान्य वितरणात अफरातफर,धान्याचे कमी वाटप तर काही पात्र कार्डधारकांना अन्नधान्य दिल्या नसल्याच्या कारणाखाली ही कारवाई केल्याचे ‘फ’ परिमंडळचे उपनियंत्रक प्रशांत काळे यांनी सांगितले.ठाणे,अंबरनाथ,कल्याण,उल्हासनगर, भाईंदरमधील नऊ दुकाने रद्द वा निलंबित करण्यात आले असून शिवाय दुकानदारांकडून ३७ लाख ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.अनेक लाभार्थ्यांना रेशन कमी मिळते,पावती मिळत नाही,काही दुकानदार दुकान उघडे ठेवण्याची वेळ पाळत नाहीत,मनमानी करत कोणत्याही वेळेला उघडतात आणि बंद करतात.धान्य असतानाही परत पाठवतात याची तक्रार जर रेशन कार्डधारकांनी केली त्याच दुकानाबाबत तक्रारींचे प्रमाण वाढल्यास पुरवठा विभाग त्या दुकानावर कारवाई करतात.दुकानातील धान्य तपासणी केली जाते.महिनाभरात आलेले धान्य,वितरित धान्य यामध्ये दोषी आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाते.गंभीर दोष आणि सौम्य दोष लक्षात घेऊन दुकान रद्द किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येते.कमी वजनाचा शिधा,वेळेत शिधा देण्यास टाळाटाळ,अफरातफर असे प्रकार आढळले असून दुकानदारांकडून ५ लाखांचे जिन्नस जप्त करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.