“मत मागण्यासाठी आमच्या चाळीत पाय ठेवू नये…” !! वरळी बीडीडी चाळीत झळकले फलक !! रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार
“कुठल्याही राजकीय पक्षाने,उमेदवाराने प्रचारासाठी वा मत मागण्यासाठी आमच्या चाळीत पाय ठेवू नये”,टप्पा १ मधील घरे आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची,राज्य सरकार,म्हाडाचा जाहीर निषेध असा आशयाचे अनेक फलक वरळी बीडीडीतील चाळींबाहेर झळकत आहेत.वरळी बीडीडी चाळीतील ३५ हून अधिक चाळींतील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे.परिणामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न चिघळण्याची चिन्हे आहेत.वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित इमारतींच्या टप्पा १ मध्ये समाविष्ट असलेल्या चाळी डावलण्यात आल्या व त्याऐवजी टप्पा ३ मधील चाळीचा टप्पा १ मधील पुनर्विसित इमारतीत समाविष्ट करण्यात आल्या याला रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे.आम्हाला टप्पा १ मध्येच समाविष्ट करावे अशी या रहिवाशांची मागणी आहे.हा मोठा गोंधळ राज्य सरकार आणि म्हाडाने घातल्याचाही आरोप रहिवाशांनी केला आहे त्यामुळेच राज्य सरकार आणि म्हाडाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून ३५ हून अधिक चाळींतील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना.म.जोशी मार्ग,नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे त्यानुसार तिन्ही ठिकाणच्या पुनर्वसित इमारतींच्या पहिल्या टप्प्यातील कामाने वेग घेतला आहे.वरळीतील पुनर्वसित इमारतीतील अंदाजे ५५० घरे मार्च-एप्रिल २०२५ मध्ये वितरीत केली जाण्याची शक्यता आहे असे असताना पुनर्वसित इमारतींच्या टप्पा-१ वरून आता मोठा वाद सुरू झाला आहे.मुंबई मंडळाचा आराखडा आणि प्रस्तावानुसार टप्पा १ मध्ये बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसित इमारतींमधील घरे कोणत्या चाळीतील रहिवाशांना द्यायची हे याआधीच निश्चित करण्यात आले आहे तर टप्पा २ आणि ३ मधील चाळींतील रहिवाशांना कोणत्या इमारतीत घरे द्यायची हेही निश्चित करण्यात आले आहे.त्यानुसार चाळींच्या सोडती काढण्यात येत आहेत.असे असताना आता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एक दिवस आधी टप्पा ३ मधील काही चाळींना अचानकपणे टप्पा १ मध्ये समाविष्ट करून त्यांची सोडत काढण्यात आली यात पोलिसांच्या चाळीचाही समावेश आहे.मुंबई मंडळाच्या या निर्णयानंतर टप्पा-१ मधील मूळ रहिवासी आक्रमक झाले आहेत.टप्पा १ मधील पुनर्वसित घरांवर आमचा हक्क असताना आम्हाला डावलून टप्पा ३ मधील रहिवाशांना टप्पा १ मध्ये कसे समाविष्ट करण्यात आले असा प्रश्न उपस्थित करून टप्पा १ मधील मूळ रहिवाशांनी मुंबई मंडळाच्या या निर्णयाला विरोध केला आहे.
राज्य सरकार आणि मुंबई मंडळाने पुनर्विकास प्रकल्पात घातलेला हा गोंधळ मोठा असून हा आमचा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया वरळीतील रहिवासी निलेश गायकवाड यांनी व्यक्त केली.राजकीय दबावाला बळी पडून हा निर्णय घेण्यात आला असून हा आमच्यावर मोठा अन्याय आहे त्यामुळे टप्पा १ मध्ये डावलण्यात आलेल्या ३५ हून अधिक चाळींतील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही कोणीही मतदानाला जाणार नाही इतकेच नव्हे तर कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रचारासाठी आमच्या चाळीत येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका रहिवाशांनी घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले.चाळ क्रमांक १,२,३,४,५,६,७,१२,१३,१४,१५,१६,२१,२९ सह अन्य चाळींतील रहिवाशांनी म्हाडाचा निषेध करत मतदानावर बहिष्कार टाकला आहे व यासंबंधीचे फलक वरळी परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.दरम्यान याविषयी मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.