मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ ऑक्टोबर २४ शनिवार
राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे व त्यासाठी प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे तसेच जागावाटपाची चर्चा सुरू आहे व अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी समोर येत आहे.२०२२ साली जेव्हा शिवसेनेपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी फारकत घेतली होती तेव्हा सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीचा दौरा केला होता.सत्तांतराच्या हालचालीत गुवाहाटीचा दौरा चांगलाच गाजला त्यातच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी,काय डोंगर,काय ते हॉटेल” या डायलॉगमुळे जनसामान्यांमध्येही गुवाहाटीची खमंग चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला जात आहेत.गुवाहाटीचा दौरा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते.आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचे कळते.प्रचाराचा नारळ कामाख्या देवीच्या मंदिरात फोडल्यानंतर ते राज्यात प्रचारचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जाते.
यावर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनीही प्रतिक्रिया दिली असून संजय शिरसाट यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारला गेला त्यावर ते म्हणाले की,मीही शिंदे यांच्या दौऱ्याबाबत ऐकले.जर मुख्यमंत्री गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असतील तर चांगलेच आहे.कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणे काही गैर नाही.कामाख्या देवीच्या आशीर्वादामुळे आमचा उठाव यशस्वी झाला.काही लोक आमचा पोस्टमॉर्टम करणार होते त्यांना कामाख्या देवीचा शाप लागला त्यातून ते आताही बाहेर पडलेले नाहीत त्यामुळे कामाख्या देवीचा आशीर्वाद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे.