Just another WordPress site

मविआचा जागावाटपाबाबतचा फार्मुला ठरला !! नाना पटोलेंनी जाहीर केला मुहूर्त !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२१ ऑक्टोबर २४ सोमवार

भारतीय जनता पक्षाकडून आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे पण अद्याप महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना भाजपानं पहिली यादी आधीच जाहीर केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.एकीकडे महायुतीमध्ये ही स्थिती असताना महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप किंवा उमेदवार यादी हे काहीच जाहीर झालेले नाही त्यामुळे चर्चेला सुरुवात झाली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जागावाटपाबाबत मोठे विधान केले आहे.महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष भाजपाने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे आता शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्यात उरलेल्या १८९ जागांचे वाटप केले जाईल असे सांगितले जात आहे मात्र त्याचवेळी भाजपाची ही पहिली यादी असून या १८९मध्ये भाजपाचे आणखी काही उमेदवारही असण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांची गणित मांडली जात आहेत त्यात आता महाविकास आघाडीकडूनही जागावाटप अंतिम झाले असून ते जाहीर करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या निवडणूक समितीची आज बैठक होणार असून त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.यावेळी त्यांना मविआच्या प्रलंबित जागावाटपाबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्या म्हणजेच २२ ऑक्टोबर रोजी जागावाटप जाहीर केले जाईल असे सांगितले.“महाविकास आघाडीचे ठरले असून उद्या पहिली यादी येईल.आम्ही तिघे मिळून उद्या संध्याकाळी यादी जाहीर करू” असे नाना पटोले यावेळी म्हणाले.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले व संजय राऊत यांच्यात उमेदवारी व जागावाटपावरून वाकयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळाले होते पण दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही जागेवरून कोणतेही वाद नसल्याचा दावा आता नाना पटोलेंनी केला आहे.काँग्रेस व शिवसेनेत कोणतेही वाद नाहीत.कशाला उगाच आमच्यात भांडण लावताय ? आम्ही नसीम खान यांना शरद पवारांकडे पाठवले होते. आमची यादी त्यांच्याकडे होती.ते उद्धव ठाकरेंच्याही संपर्कात होते.आमची मुंबईतही चर्चा आहे.काल काही कारणास्तव आमची बैठक रद्द झाली.पण आज बैठक आहे. विदर्भातील १२ जागांबाबतही महाविकास आघाडीत वाद नाहीत.शिवसेना आमच्याच जागा मागते वगैरे कोणतीही चर्चा झालेली नाही.मेरिटवर उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली” असे नाना पटोलेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.दरम्यान रविवारी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे तसेच या यादीमध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आल्याचे दिसून येत आहे.त्याशिवाय नुकतेच काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांच्या मुलीला देखील भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.