Just another WordPress site

राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर !! राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा !!

लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, विधानसभेत एकला चलो रे… !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार 

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली जात असून भाजपाने २० ऑक्टोबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे व त्यानंतर एकापाठोपाठ एक अनेक संभाव्य याद्या समोर येऊ लागल्या आहेत.महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना आता राज ठाकरेंनीही मैदानात उडी घेतली असून त्यांनीही काल दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.ते डोंबिवली येथे बोलत होते.उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे.आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल पण त्यापूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो आहे.येत्या २४ तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे आले होते.कल्याण ग्रामीण मधून मनसेतर्फे राजू पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत.तेथेच त्यांनी राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्या नावांची घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मनसेने शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष या महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता.आता विधानसभेसाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन महायुती सोबत न राहता आपले उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे त्यामुळे लोकसभेच्या काळात महायुतीबरोबर असणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेच्या उमेदवारांचा सामना आता भाजपा,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर असणार आहे.लोकसभा निवडणुकीच्यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासाठी झटून काम केले होते. कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीला नकारात्मक वातावरण असुनही स्थानिक शिवसेना कार्यकर्ते,आमदार पाटील यांनी झटून केलेल्या कामामुळे खा.शिंदे यांचे या भागातील मताधिक्य वाढले होते.आता महायुतीमधून मनसे बाहेर पडल्याने राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये एकाकी लढत द्यावी लागणार आहे.या मतदारसंघात राजू पाटील दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत.यापूर्वीच्या निवडणुकीत ते दिवा भागाने दिलेल्या साथीने सहा ते सात हजाराच्या फरकाने निवडून आले होते.राजू पाटील यांची लढत उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर,शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी होणार आहे.या मतदारसंघात भाजपमधून कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.