मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज दि.२९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे अनेकांची धावपळ सुरु आहे तर काही नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे असे असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर काही संशयितांनी हल्ला आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे.मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अद्वय हिरे हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे आहेत.सध्या मालेगावमध्ये राजकारण तापले असून अद्वय हिरे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.यासंदर्भात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटासर दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसेंच्या गुंडांनी हल्ला केला असून ते प्रचाराच्या फेरीत असताना वाहनांवर हल्ला केला असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे लोक पराभवाच्या भितीने आमच्या लोकांना धमक्या देत आहेत.आमच्या लोकांवर दबाव आणणे आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरु आहेत.काल संध्याकाळी मालेगाव बाह्यचे आमचे उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर दादा भुसे यांच्या गुंडांनी हल्ला केला.अद्वय हिरे हे प्रचाराच्या फेरीत असताना दादा भुसेंच्या लोकांनी अद्वय हिरेंच्या वाहनांवर हल्ला केला यावेळी हल्लोखोरांकडे लोखंडी गच,तलवारी,गावठी पिस्तुल होती.अद्वय हिरेंना ठार मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला.आमचे पाच शिवसैनिक यामध्ये जखमी झाले.पोलिसांनी यासंदर्भात अद्यापही ठोस कारवाई केली नाही हे प्रकरण फक्त मालेगावबाबत मर्यादीत नाही.या महाराष्ट्रामध्ये निवडणुका त्यांना शांततेत करायच्या नाहीत असा याचा अर्थ होत आहे.सध्या पोलीस यंत्रणा राजकीय कामाला जुंपलेली आहे.काल अद्वय हिरे हे सुदैवाने बचावले आहेत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.अशा प्रकारे या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे मग अशा पद्धतींना निवडणुका होणार आहेत का ? मी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना आवाहन करतो की,महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना तातडीने बदला आणि या गुंडशाही झुंडशाहीच्याबाबत कठोर कारवाईचे आदेश द्या.काही दिवसांपूर्वी अद्वय हिरे तुरुंगात असतानाही त्यांच्यावर दबाव आणला जात होता.आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत मात्र आम्ही अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नाहीत असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.