अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना युवा स्वाभिमान पक्षाची उमेदवारी देऊन घडवून आणलेले बंड महायुतीसाठी अडचणीचे बनले आहे.महायुतीत दर्यापूरची जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला मिळाली असून या ठिकाणी माजी आमदार अभिजीत अडसूळ हे उमेदवार आहेत व त्यांच्या विरोधात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे महायुतीत फूट पडली आहे.राणा यांनी अडसूळ यांच्या उमेदवारीला सुरूवातीपासून विरोध दर्शविला होता.अडसूळ यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना केलेला केलेला विरोध हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले व आता त्याचा सूड म्हणून रवी राणांनी अडसुळांना थेट आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
महायुतीतील या पेचप्रसंगावर मार्ग निघावा यासाठी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली पण अजूनही तोडगा निघू शकलेला नाही.भाजपची दर्यापूर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक काल पार पडली यावेळी गुजरातचे कॅबिनेट मंत्री ऋषिकेश पटेल, आनंदराव अडसूळ,विवेक गुल्हाने,कमलकांत लाडोळे आदी उपस्थित होते.डॉ.बोंडे यांनी भाजपची यंत्रणा ही अडसूळ यांच्यासोबत असल्याचे संकेत दिले आहेत पण रवी राणा यांची खेळी ही अडसूळ यांच्यासाठी डोकेदुखीची बनली आहे.भाजपने मित्र पक्ष म्हणून केवळ बडनेरात रवी राणा यांना समर्थन दिले आहे बुंदिले यांना नाही. महायुतीच्या उमेदवाराला अपशकून करण्यासाठी रमेश बुंदिले यांना बळीचा बकरा बनविण्यात आले आहे अशी टीका भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद नळकांडे यांनी केली आहे.भाजपने बडनेरा मतदारसंघात रवी राणांना पाठिंबा दिला आहे व त्यांच्या पत्नी नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत.नवनीत राणा यांनी देखील अडसूळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता.महायुतीतील बंडखोरीबाबत नवनीत राणा यांनी मात्र मौन बाळगले आहे.रवी राणांनी मंगळवारी बडनेरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दर्यापूरचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले आवर्जून उपस्थित होते.महायुतीचे नेते बुंदिले यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करीत आहेत व आता रवी राणा काय भूमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.