महायुतीच्या जागावाटपात भारतीय जनता पार्टीने १५२ जागा मिळवल्या आहेत त्यापैकी १४८ जागांवर त्यांनी स्वतःचे उमेदवार जाहीर केले आहेत तर त्यांनी चार जागा त्यांच्या मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ८० जागा मिळाल्या असून त्यांनी दोन जागा मित्रपक्षांना दिल्या आहेत.अजित पवारांना वाटाघाटीत केवळ ५३ जागा मिळाल्या असून त्यांनी या सर्व जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.महायुतीने एकूण २८३ जागांवर २८८ उमेदवार दिले आहेत.पाच मतदारसंघात महायुतीचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत तर पाच मतदारसंघांमध्ये महायुतीने उमेदवार दिले आहेत की नाही हे कळू शकलेले नाही.मालेगाव मध्य मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही.दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या जागावाटपातही सावळागोंधळ पाहायला मिळाला.अखेरच्या दिवसापर्यंत त्यांच्या जागावाटपावरील चर्चा चालूच होत्या.मविआच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे कारण त्यांनी राज्यात तब्बल १०४ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ८७ उमेदवार दिले आहेत. मविआने राज्यातील एकूण २७७ जागांवर २८२ उमेदवार दिले आहेत.पाच मतदारसंघांमध्ये मविआचेच प्रत्येकी दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत तर इतर १० मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत की नाही किंवा या जागांवर त्यांच्या मित्रपक्षांचा उमेदवार आहे का ? हे कळू शकलेले नाही.