समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून छगन भुजबळ यांनी समीर यांना उमेदवारी करण्यापासून रोखणे आवश्यक होते असे शिंदे गटाचे म्हणणे होते.परिणामी अजित पवार गटास जशास तसे स्वरुपात उत्तर देण्याची खेळी शिंदे गटाकडून खेळली गेली.जिल्ह्यातील दिंडोरी आणि देवळाली या दोन्ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक तास बाकी असताना नाट्यमय घडामोडी घडल्या.देवळालीत अजित पवार गटाच्या उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्याविरोधात माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना तर दिंडोरीत अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी झिरवळ यांच्याविरोधात माजी आमदार धनराज महाले यांना शिंदे गटातर्फे एबी अर्ज देण्यात आले.दिंडोरीत तर शेवटची अवघी काही मिनिटे उरली असताना महाले यांनी पक्षाचा एबी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला.महामार्गाने एबी अर्ज उमेदवारांपर्यंत झटपट पोहचविणे शक्य नसल्याने त्यासाठी मुंबईहून विशेष विमानाने शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांना एबी अर्ज घेऊन नाशिकला पाठविण्यात आले.अजित पवार गटाविरुद्धच्या उमेदवारांविरुद्ध शिंदे गटाची ही तत्परता थक्क करणारी आहे. एवढेच नव्हे तर इगतपुरी-त्र्यंबकेश्वर आणि येवल्यातही अजित पवार गटाच्या उमेदवारांविरुद्ध एबी अर्ज देण्याची तयारी शिंदे गटाने केली होती परंतु वेळेअभावी ते शक्य झाले नसल्याचे सांगितले जाते.समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये उमेदवारी केल्यानेच शिवसेनेच्या शिंदे गटाने देवळाली,दिंडोरीत उमेदवारांना एबी अर्ज दिल्याचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांचे म्हणणे आहे.समीर भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे सुरु झालेला संघर्ष माघारीच्या मुदतीपर्यंत निवळण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून निश्चितच होतील परंतु समीर यांच्या उमेदवारीनंतर नांदगावमध्ये सुरु झालेले धमक्यांचे सत्र पाहता समीर हे माघार घेण्याची शक्यता कमीच असून त्यांनी उमेदवारी कायम ठेवण्याचाच निर्धार केला आहे त्यामुळे देवळाली आणि दिंडोरीविषयी शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे विशेष म्हणजे महायुतीतील या संघर्षावर जिल्हास्तरीय भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले आहे.