हरकतीनंतरही आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांचे अर्ज मंजूर !! मात्र हरकतीचा मुद्दा न्यायालयात जाणार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार
आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोघांचेही अर्ज मंजूर झाले असले तरी हा वाद आता पुढील काळामध्ये न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील हाय व्होल्टेज मतदार संघ झालेला आहे.आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यामध्ये या निवडणुकीत मोठा संघर्ष पाहावयास मिळत आहे.काल उमेदवार अर्ज छाननीमध्ये दोघांचेही अर्जांवर अपक्ष उमेदवारांनी हरकती नोंदवल्या होत्या एवढेच नव्हे तर यासाठी स्वतंत्र वेळ देऊन या हरकतीवर स्वतंत्र सुनावणी देखील घेण्यात आली.दोन्ही कडची ही वकील युक्तिवाद करत होते मात्र निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दोन्ही अर्ज वैद्य ठरवत या सर्व हरकतींवर पडदा पाडला.असे झाले असले तरी देखील यामध्ये न्यायालयीन संघर्ष निर्माण होणार आहे असे चित्र दिसून आले.आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार विकास राळेभात यांनी हरकत घेतली होती.यामध्ये त्यांनी हरकत नोंदवली की रोहित पवार यांनी जो अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्र आहेत याची ऑनलाईन माहिती पाहिली असता काही कागदपत्र ऑनलाइन वर दिसून येत नाहीत मात्र मूळ प्रतीमध्ये मात्र ते जोडण्यात आलेले आहे.या हरकतीवर दुपारी साडेतीन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवाराची प्रतिनिधी दोन्हीकडचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला.निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी रोहित पवार यांनी अर्ज भरतानाच सर्व कागदपत्रे नोंदणीकृत पद्धतीने दिलेले आहेत.ऑनलाइन कागदपत्रे नोंदवताना एखादी कागदपत्र अनावधानाने राहू शकते मात्र त्यामुळे उमेदवाराचा अर्ज बाद होत नाही यानंतर आमदार रोहित पवार यांनी भरलेला उमेदवारी अर्ज वैद्य असल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिला.
आमदार राम शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार श्री कोकरे यांनी हरकत घेतली होती.यामध्ये त्यांनी म्हटले आहे की आमदार राम शिंदे यांनी एक जागा त्यांच्या नावावर असताना त्याची माहिती प्रतिज्ञा पत्रामध्ये दाखवलेली नाही किंवा नोंदवलेले नाही तसेच त्यांच्यावर दाखल असणारी सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आलेली नाही यामध्ये ज्या गुन्ह्यातून त्यांची मुक्तता झाली आहे आणि जे गुन्हे शिल्लक आहेत याबाबत उल्लेख पूर्ण दिलेला नाही अशाप्रकारे प्रतिज्ञा पत्रावर मधील विविध मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आला होता.दुपारी तीन वाजता या आक्षेपाच्या अर्जावर सुनावणी झाली आणि त्यानंतर आमदार राम शिंदे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी मंजूर केला आहे.यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितले की,उमेदवारांनी भरलेल्या अर्जाबाबत काही त्रुटी असतील तर त्याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार माझा आहे.कोणत्या उमेदवाराने प्रतिज्ञा पत्रामध्ये काय माहिती दिली आहे आणि त्यात सत्यता किती आहे किंवा खोटी माहिती आहे की खरी आहे याची तपासणी करून अर्ज वैद्य ठरवणे हा माझा अधिकार नसून प्रतिज्ञा पत्राची तपासणी फक्त न्यायालयामध्ये होऊ शकते त्यामुळे उमेदवारांनी दिलेले अर्ज हे पूर्ण माहिती आणि योग्य भरलेले असल्यामुळे दोन्हीही अर्ज मंजूर करत आहे असे सांगितले.दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही अर्ज मंजूर केले असले तरी देखील पुढील काळामध्ये आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यातील हरकतींचा मुद्दा न्यायालयामध्ये जाणारा असून पुढील काळात न्यायालयीन संघर्ष आपल्याला पाहावयास मिळणार आहे.काल झालेल्या छाननीमध्ये आमदार राम शिंदे यांच्या पत्नी आशाबाई रामदास शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नावावर भरलेले उमेदवारी अर्ज एबी फॉर्म नसल्यामुळे अवैद्य ठरविण्यात आले आहे.कर्जत जामखेड विधानसभेसाठी एकूण २३ उमेदवारांनी ३७ अर्ज भरले होते त्यापैकी चार अर्ज अवैद्य ठरले असून आता २३ उमेदवारांचे ३३ अर्ज शिल्लक आहेत.अर्ज माघारी नंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल.