मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :_
दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार
महाराष्ट्र सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना महिलांकरता अंमलात आणली व या योजनेला ४ कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला असून यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दरम्यान आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यावर पाठवले आहे व आता आचारसंहिता लागल्याने महिला आणि बालविकास मंत्रालयात या योजनेसाठी निधी थांबवण्यात आला आहे.दरम्यान यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे ते एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात बोलत होते.लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकदा या योजनेविरोधात सरकारला धारेवर धरले होते.आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारवर निशाणा साधला.लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले,“ज्याचा काही थांगपत्ता लागू शकत नाही अशी निवडणूक पहिल्यांदाच मी पाहतोय त्यामुळे आता ते काय करणार आहेत हे माहीत नाही.माझे इतकेच म्हणणे आहे की कोणतीही गोष्ट फुकट देऊ नये कारण कोणीही फुकट मागत नसते.महाराष्ट्रातील भगिनींना सक्षम बनवा,त्यांच्यासाठी उद्योगधंदे आणा.त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ देत.त्या कुठे सांगतात मेहनतीशिवाय पैसे द्या.तुम्ही देताय म्हणून घेत आहेत.त्यांना लाचार बनवताय.फुकट गोष्टी देऊन त्यांना लाचा बनवतोय. आपण चुकीचे करतोय.” असे राज ठाकरे यांनी नमूद केले.
उद्या तरुणांना पैसे द्यायला सुरुवात केलीत ते म्हणतील आता मला काम करण्याची गरजच नाही.पैसे मिळाल्यावर तरुण काहीही करेल.तो ड्रग्स घेईल.माझे असे मत आहे की सरकारचे काम आहे की त्यांच्या हाताला काम देणे.शेतकरी कुठे मोफत वीज मागतोय.फक्त त्यात सातत्य ठेवा.थोडी कमी किंमतीत द्या असेही राज ठाकरे म्हणाले. फुकट देण्याकरता एक-दोन महिना पैसा पुरेल त्यासाठी कुठून तरी पैसे काढाल पण नंतर महाराष्ट्र दिवाळखोरीला लागेल.महाराष्ट्र कंगाल होईल व या फुकटच्या योजनांमुळे एक लाख कोटीचे कर्ज होईल.आपण अजूनही कर्ज वाढवतोय व अशाने सरकार चालणार नाही असेही राज ठाकरे म्हणाले.निवडणुकीच्या निकालानंतर कोणाचे सरकार बनेल असे राज ठाकरेंना विचारण्यात आले त्यावर ते म्हणाले,सरकार युतीचे बनेल.तीन महिन्यांपूर्वी वाटत होते की आघाडीचे पारडे जड आहे पण हरियाणाच्या निकालांनंतर आता तसे वाटत नाही अर्थात ही निवडणूक युतीला तितकी सोपीही नाही असेही राज ठाकरे म्हणाले.