“धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली” !! शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ ऑक्टोबर २४ गुरुवार
२००९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेवर येऊन २०२१ ला पायउतार व्हावे लागले व शिवसेनेत झालेली बंडखोरीमुळे सरकार कोसळले.तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले व त्यानंतर शिवसेनेतील बंडखोरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली त्यामुळे शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले.यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवानेते आणि माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमित ठाकरे यांनी भाष्य केले आहे.२०२१ च्या जून महिन्यात शिवसेनेत मोठी फूट पडली.एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन भाजपाला समर्थन दिले त्यामुळे शिवसेनेकडे आणि पर्यायाने महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला तर दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपाने त्यांच्याकडे असलेले बहुमत सिद्ध केले अन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.राज्यात एकीकडे अशी उलथापालथ झालेली असताना शिवसेनेतील बंडाळीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली.
पुरावे,बहुमत आणि इतर कायदेशीर प्रक्रियांनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना मूळ शिवसेना म्हणून सिद्ध झाली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच पक्षाचे अधिकृत चिन्ह असलेले धनुष्यबाणही मिळाले यावरून अमित ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत बोलताना अमित ठाकरे म्हणाले,“एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे चिन्हआणि नाव घेतले ते चुकीचे केले.नागरिक म्हणून पाहताना ते मला चुकीचे वाटत आहे.पक्षचिन्ह आणि पक्षनाव बाळासाहेबांचे आहे ते त्यांचेच राहायला पाहिजे होते.लोकांच्या विश्वासाने त्यांनी हे निर्माण केले होते.” असे अमित ठाकरे यांनी नमूद केले आहे.